मुंबई : महान्यूज लाईव्ह
आजही ग्रामीण भागात एखाद्या पारावर बसल्यावर ‘ पाव्हण, द्या की जरा गायछाप, आणि जरा चुना बघू की ‘ असे म्हणत गप्पांचा फड रंगवणारे लोक भेटतात. आजकालच्या काळात गुटख्याने तंबाखूची क्रेझ संपवली असली, तरी अजूनही गायछाप तंबाखू आपली लोकप्रियता टिकवून आहे. याच गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असल्याचे भासवून एका महिलेला तब्बल ९३ लाखाचा गंडा घालता गेला आहे.

नवी मुंबईतील सानपाडा येथील जमुना वडगाये यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. त्या बदलापूर नगरपरिषदेचे लेखा विभागातील सहाय्यक संचालक प्रवीण वडगाये यांच्या पत्नी आहेत. २०१९ मध्ये जमुना यांची फेसबुकवर एका तरुणासोबत ओळख झाली. या तरुणाने स्वत:चे नाव द्रिश मालमाणी असल्याचे सांगितले. आपण गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असून आपला वडिलांबरोबर संपत्तीबाबत वाद सुरु असल्याचे त्याने सांगितले होते.
त्यानंतर त्याने पुण्यात क्लब सुरु करणार असून त्यात पैसे गुंतवल्यास दोन वर्षात दुप्पट रक्कम देण्याचे आश्वासन दिले. जमुना यांनी त्यांच्याकडील काही बचत आणि दागिन्याची विक्री करुन ९३ लाख १६ हजार रुपये या तरुणाला दिले. त्यानंतर या व्यवहाराचा करार करण्याचे ठरले. परंतू करार करण्यासाठी तो चालढकल करत होता. त्यानंतर त्याने वडिलांबरोबर संपत्तीबाबत खटला सुरु असल्याचे सांगून लवकरच पैसे परत करतो असे सांगून आणखी रकमेची मागणी केली. त्यानंतर काही काळात त्याने फेसबुक आणि मोबाईवर जमुना यांना ब्लॉक केले.
ऐवढे सगळे झाल्यानंतर जमुना यांनी संगमनेर गाठले. त्यावेळी उद्योगपती मालपाणी यांना द्रिश नावाचा कोणीही मुलगा नसल्याचे सत्य त्यांच्यासमोर आले.
आता त्यांनी सानपाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहेत. वडगाये यांच्या आर्थिक स्थितीची माहिती असणाऱ्यानेच त्यांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.