बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नामवंत प्राध्यापक डॉ. के. एस. अय्यर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नुकतीच राज्यस्तरीय एक दिवसीय नेट सेट कार्यशाळेचे आयोजन इंग्रजी विभागामार्फत करण्यात आले होते. ‘ आपल्या हयातीत अय्यर सरांनी अशा अनेक कार्यशाळा मोफत घेतल्या होत्या. त्याचा लाभ घेऊन आतापर्यंत ३०० हून अधिक विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. अय्यर सरांची ही ज्ञानदानाची परंपरा विद्या प्रतिष्ठानमध्ये अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय खिलारे हे कटिबद्ध असल्याचे सूतोवाच प्रा. विलास बुवा यांनी या प्रसंगी केले.
डॉ. विलास बुवा हे या कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते आणि उद्घाटक म्हणून लाभले होते. या कार्यशाळेत ऑनलाइन आणि प्रत्यक्ष असे एकूण 171 विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. सदर कार्यशाळेत प्रा. बुवा यांच्याबरोबरच डॉ. खिलारे यांनी देखील इंग्रजी भाषेचा इतिहास या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भरत शिंदे होते. त्यांनी अय्यर सरांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे विद्यार्थ्यांप्रती असणारे प्रेम, त्याग व त्यांच्या कामाची माहिती दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊनच महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग दरवर्षी अशी कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत प्रा. डॉ. राजेंद्र खैरनार, डॉ. आनंदा गांगुर्डे, डॉ. श्रीराम गडकर, डॉ. सुनिल ओगले, प्रा. राजेंद्र वळवी हे उपस्थित होते. ऑनलाइन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. राजकुमार कदम यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. दादा मगर यांनी करून दिला. समारोपाचे आभार प्रदर्शन प्रा. नुपुर डोईफोडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे आणि डॉ. लालासाहेब काशिद तसेच नॅक समन्वयक प्रा. निलिमा पेंढारकर यांनी मोलाची मदत केली. या विद्यार्थीभिमुख कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. नीलिमा गुजर, विश्वस्त सौ. सुनेत्रावहीनी पवार, डॉ. राजीव शहा, श्री. किरण गुजर, श्री. मंदार सिकची व रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी कौतुक केले.