सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीत पायाभूत मुलभूत सुविधांसाठी निधी देण्यात यावा अशी मुस्लिम समाजातील नागरिकांच्या बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. या मागणीचा विचार करून तालुक्यामध्ये २ कोटी २० लाखाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये अल्पसंख्यांक वस्तीमध्ये रस्ते करणे, ईदगाह मैदान करिता संरक्षक भिंत बांधणे, जारत सभामंडप, शादीखाना बांधणी, कब्रस्तान सुशोभीकरण करणे आदी कामे करण्यात येणार आहे.
तालुक्यातील भिगवण येथील भिगवन स्टेशन येथे कब्रस्तान अंतर्गत रस्ता १५ लाख ,भिगवण मस्जिद सुशोभीकरण करणे ५ लाख ,कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १० लाख,वडापूरी येथे कब्रस्तान दुरुस्ती करणे ३० लाख , पिंपरी बुद्रुक येथील जारत सभा मंडप बांधणे ५ लाख ,पिंपरी बुद्रुक येथे ईदगाह भिंत बांधणे ५ लाख , पिंपरी बुद्रुक येथे ओझरे रस्ता ते कब्रस्तान रोड कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख ,पळसदेव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १५ लाख ,शेळगाव येथील कब्रस्तान अंतर्गत रस्ता १० लाख, निमगाव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १० लाख, निमगाव येथे दफनभूमी कडे जाणारा रस्ता २० लाख, सणसर येथे कब्रस्तान संरक्षण भिंत १५ लाख ,बेलवाडी येथे कब्रस्तान अंतर्गत रस्ता १० लाख , लासुर्णे येथे शादीखाना २० लाख, कुरवली येथे कब्रस्तान ईदगाह मैदान १० लाख ,सराफवाडी येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १५ लाख,वरकुटे येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १५ लाख आदी कामांना निधी देण्यात आला आहे.