माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
जुन्या वादाच्या कारणावरून पुण्यातील नांदेड फाट्याजवळ एका तरुणांची सातजणांनी कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली होती. यातील दोन मुख्य सूत्रधार आरोपी दादा चव्हाण व राज जाधव बालाजीवरून सोलापूर मार्गे मुंबईला रेल्वेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हवेली पोलिसांनी सोलापूर रेल्वे स्टेशनवर सापळा रचून शिताफीने दोघांनांही पकडले. या दोघांवर यापूर्वीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आत्तापर्यत या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली असून तिघे जण फरार आहेत.
मारुती लक्ष्मण ढेबे वय २१ ( रा. वारजे माळवाडी ) या तरुणाची आरोपीनी बुधवार दि. २३ मार्च रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हत्या केली होती. या हत्येचे मुख्य आरोपी कृष्णकांत उर्फ दादा चंद्रकांत चव्हाण ( वय २४ ) व दशरथ उर्फ राज दत्तात्रय जाधव ( वय २४ ) ( दोघेही रा. गोसावीवस्ती, नांदेडफाटा ) यांना हवेली पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दादा चव्हाण व राज जाधव यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, यातील दोन फरार आरोपी अमोल अर्जुन शेलार ( वय २१ ) व अभिजित राम गंगणे ( वया २१ ) ( रा. जनता वसाहत ) या दोन आरोपींना रांजणगाव येथील लॉजवरून पुणे क्राईम ब्रांचचे अमोल शेडगे, पूनम गुंड यांनी शिताफीने अटक केली होती. अजुनही आदित्य आधवडे याच्यासह दोन आरोपी फरार आहे.
पोलीस हवालदार दिनेश कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खून प्रकरणातील दोन मुख्य आरोपी तिरुपती बालाजीच्या परिसरात असल्याची गोपनीय माहिती हवेली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, सहायक उपनिरीक्षक प्रदीप नांदे, पोलीस अंमलदार नीलेश राणे, विलास प्रधान यांनी गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून शिताफीने दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे. ते दोघेही मुंबईला पळून जाण्याचा बेतात असतानाच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मारुती ढेबे व आरोपी यांच्यात पूर्वीच्या जुन्या वादातून आरोपींनी मारुतीचा काटा काढायचा ठरवले होते. २३ मार्च रोजी मारुती हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या सहाजणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. यात ढेबे याचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारने पसार झाले होते. खून झालेला मारुती ढेबे हा सराईत गुन्हेगार होता. मागील वर्षी त्याच्यावर कोयत्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यातून तो थोडक्यात बचावला होता.