बारामती : महान्यूज लाईव्ह
काही माणसे जन्माला येताना जणू काही आपला ध्येय ठरवून आले असतात. मिळालेल्या आयुष्यातील काही वाटा समाजासाठी द्यायचा हे ठरवून आलेले असतात. असे लोक समाजसेवक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणातील धुरंदर अशा अनेक भूषणांनी युक्त असलेले आपण अनुभवतो. त्यांचे काम आपण पाहत असतो. समाजाच्या विकासामध्ये आपला खारीचा वाटा असलाच पाहिजे याकडेही लोक नेमस्तपणे आपले लक्ष देत राहतात. मात्र ते सतत प्रसिद्धीच्या पडद्याआड असतात.
आजच्या व्यक्तिवेध मध्ये पुणे जिल्ह्यातील असाच एक अवलिया पत्रकार आपण अनुभवणार आहोत. तो म्हणजे बारामतीच्या पश्चिमेकडील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात शिक्षणाचे अमूल्य कार्य गेली अनेक वर्ष गोरगरिबांच्या व तळागळातील दुर्लक्ष त्यांच्या झोपड्यांपर्यंत पोहोचवणारा, त्यासाठी सहकार्यांसोबत गेली काही वर्षे निस्पृहपणे कष्टणारा हा पत्रकार आहे संतोष शेंडकर!
पुण्यातील पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) या संस्थेच्या वतीने नुकताच संतोष शेंडकर यांना बालरक्षक हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील काही शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला, मात्र शिक्षकांव्यतिरिक्त पुरस्कार मिळवणारी ही व्यक्ती ठरली संतोष शेंडकर! त्यामुळेच या व्यक्तीची सध्या शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे!
आशा प्रकल्पाच्या माध्यमातून व सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या सहयोगातून ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी संध्याकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेतील एक शाळा चालवण्याचे काम सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने संतोष शेंडकर यांच्यावर सोपवले आणि संतोष यांनी अत्यंत आनंदाने ते काम खांद्यावर घेतले.
आता सर्वांच्या सहकार्याने हे काम अविरतपणे सुरू आहे. कारखाना कार्यस्थळावरील सातशे ते आठशे ऊसतोड मजुरांच्या कोप्यांमधील 277 मुलांसाठी सहा ते सात शाळा या रात्र शाळा म्हणून सुरू आहेत. यामध्ये जवळपास 227 मुले आनंदाने शिक्षण घेत आहेत.
संतोष शेंडकर यांचं काम तेवढ्यापुरतं मर्यादित नाही समाजातील पुरोगामी विचारसरणीच्या अनेक गोष्टींना सातत्याने पुरस्कृत करून त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजून हे काम पुढे नेण्याचं काम संतोष शेंडकर गेली अनेक वर्षे करत आहेत.
पारधी, डोंबारी समाजातील उपेक्षित व त्यापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी काम केले आणि ही मुले आता चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत संतोष शंकर यांनी भारत ज्ञान विज्ञान समुदाय या च्या वतीने गेले अनेक वर्ष समाजातील जनजागृतीसाठी व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होण्यासाठी प्रचंड मोठे काम केले आहे. वंचित मुलांसाठी त्यांचे शिक्षणाचे काम अखंडपणे सुरू आहे.
ना. धो. महानोर यांच्या भाषेत सांगायला गेले, तर या नभाने या भुईला दान द्यावे! अन् या मातीने चैतन्य गावे! अशी कोणती पुण्ये येती फळाला; की जोंधळ्याला चांदणे लगडून जावे! जोंधळ्याचे चांदणी होणारी ही प्रक्रिया; माणसाला माणसात आणण्यासाठी कष्टाची ही प्रक्रिया अशीच सहज सोपी नसते. त्यासाठी अनेकांना गाढून घ्यावे लागते. त्या जोंधळ्याचे चांदणे होण्यासाठी खूप काम करावे लागते. अविरत करावे लागते. निस्पृह करावे लागते. निरपेक्ष करावे लागते. संतोष शेंडकर ही व्यक्ती त्यापैकीच एक असावी असे मनोमन वाटते.
खूपच अभिनंदनीय कार्य ! असाच एक प्रोग्राम ‘संकल्प’ या नावाने आदिवासी पारधी समाजाच्या मुलांसाठी राशीन, तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे श्री विजय भोसले (989011204) आपल्या पत्नी सह 2016 पासून राबवत आहेत.