दौंड : महान्युज लाईव्ह
पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावर बिरोबावाडी येथे दोन मालवाहतूक वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एका वाहनाचा चालक जागीच ठार झाला आहे. दरम्यान या वाहन चालकाचा मृतदेह हा वाहनात अडकल्याने तो काढण्यासाठी पाटस पोलीस आणि ग्रामस्थांना दोन तासांहून जास्त वेळ लागला.
पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावर गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बिरोबावाडी येथील इंडियन पेट्रोल पंप समोर हा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन मालवाहतूक वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांची मोडतोड होऊन मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भानुदास बंडगर, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, अजित इंगोले आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातामुळे पाटस आणि दौंड बाजुकडे वाकड्यातिकडी वाहने लागल्याने वाहतूक कोंडी होऊन लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान या अपघातात मृत्यू झालेल्या वाहनचालकाचे नाव श्रीरंग उर्फ श्रीहरी गायकवाड असून तो उरुळी देवाची येथील असल्याचे समजते.