दौंड : महान्यूज लाईव्ह
घरुन शाळेत स्कुटीवरुन जात असलेल्या सख्या बहिण भावावर गुरुवारी काळाने घाला घातला. दौंड – काष्टी मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप ( टेम्पो ) ने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हे सख्खे बहिण- भाऊ जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोनवडी हद्दीत घडली.
अनुष्का गणेश शिंदे ( वय १४ ), आदित्य गणेश शिंदे (वय १२ , दोघेही रा. निमगाव खलु, ता.श्रीगोंदा ) अशी अपघात मयत झालेल्या विद्यार्थांची नावे आहेत. गुरूवारी ( दि.३१ ) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दौंड ते काष्टी मार्गावरील सोनवडी हद्दीतील धनश्री लॉन्ससमोर हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु येथील अनुष्का शिंदे ही विद्यार्थीनी दौंडमधील एका खाजगी शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. तर तिचा भाऊ आदित्य हा इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होता. गुरूवारी अनुष्काची परीक्षा असल्याने हे दोघे बहिण भाऊ आपल्या दुचाकीवरून निमगाव खलू हुन दौंडला शाळेत चालले होते. सोनवडी हद्दीत धनश्री मंगल कार्यालयासमोर दौंड बाजुकडून काष्टीच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप टेप्मोने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात हे दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला तर या अपघातात दुचाकीची मोडतोड झाली.
अपघातानंतर पिकअप टेम्पोचा चालक गाडी तिथेच सोडून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत हे करीत आहेत. या अपघातामुळे निमगावात शोकळा पसरली असून बहिण भावाचा अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.