बारामती : महान्यूज लाईव्ह
पिंपळी-लिमटेक मारुती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व ह.भ.प.महादेवराव शंकरराव ढवाण पाटील यांचे सोमवार २८ मार्च रोजी, वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी श्रीमती गंगुबाई महादेव ढवाण पाटील, त्यांचा मुलगा संतोष महादेवराव ढवाणपाटील हे आहेत. संतोष ढवाणपाटील हे छत्रपती सहकारी साखर कारखानाचे विद्यमान संचालक आहेत. तसेच पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीचे प्रमुख पदाधिकारी देखील आहेत. त्यांच्या मागे एका मुलासह सात मुली,सून, नातवंडे नातू व नात आहेत. दोन्ही नातवंडे पुणे याठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत.
त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते जन्मतः पाचव्या दिवसापासून माळकरी म्हणून सांप्रदायिक झाले होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य शेती व्यवसायात गेले. त्यांची पिंपळी याठिकाणी बारामती-इंदापूर मुख्य रस्त्यालगत आणि इतर ठिकाणी बागायती शेती असून आधुनिक व नाविन्यपूर्ण शेती करणारे प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ख्याती आहे.
देशाचे केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार व अमेरिका इंटेल कंपनीचे प्रमुख ग्रेग ब्रेरेट यांच्यासह केंद्रीय पथकाने त्यांच्या शेती व फार्महाऊस याठिकाणी सदिच्छा भेट देऊन त्यांनी शेती क्षेत्रात वापरलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी शरद पवार व ग्रेग ब्रेरेट यांनी त्यांचे कौतुक केले होते. हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. प्रसिद्ध व्यावसायिक व शेतीतज्ञ स्व.आप्पासाहेब पवार यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. त्यांचे कडून त्यांना शेती तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळाले होते. यापूर्वी त्यांचे राहत्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती ॲग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे आदींनी भेटी दिल्या आहेत. त्यांचे संपूर्ण पवार व सातव कुटूंबियांशी घनिष्ठ संबंध होते व आहेत.
अतिशय जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी त्यांचा संसार थाटला होता.पिंपळी गावातील एकमेव असे व्यक्तीमत्व ज्यांनी समाज सेवेबरोबर परिवारातील सर्व मुलांना संस्कार देऊन शिक्षणात पारंगत केले होते. सरळ साधी राहणी व उच्च विचार ही त्यांची मूलभूत तत्वे होती. संतश्रेष्ठ तुकोबारायांची पालखी सोहळा जाताना व परतीच्या अशा दोन्ही वेळेस त्यांचे घरी महाप्रसाद आयोजन करीत असत तसेच आषाढ महिन्यातही त्यांची भोजनाची सेवा करत असे. अशा पद्धतीने त्यांचा जीवन प्रवास सुरू होता.
त्यांनी अनेक वेळी पायी व मोटर गाडीतून एकादशी दिवशी व पालखी सोहळा दरम्यान आळंदी-पंढरपूर वाऱ्या केल्या आहेत. पिंपळी मारुती मंदिर याठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह भरविणे. अन्नदान करणे,देणग्या देणे, रस्त्याने जाणाऱ्या गरीब वाटसरूंना जेवू घालणे. असे दानशूर व्यक्तिमत्त्व महादेवराव ( अण्णा ) ढवाणपाटील अनंतात विलीन झाले. त्यांचे अचानक जाण्याने ढवाणपाटील कुटूंबियांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावावर आणि वारकरी मंडळींवर देखील शोककळा पसरली आहे.