मुंबई : महान्यूज लाईव्ह
दोन दिवसांपूर्वी जगप्रसिद्ध ऑस्कर सोहळा पार पडला. आजपर्यंत कधी घडले नाही, ते या सोहळ्यात घडले. त्याची चर्चा सगळ्या सोशल मिडियात आजही होते आहे.
ऑस्कर सोहळ्याच्या रंगमंचावर यावेळेस एक नाट्य घडले, जे अगोदर लिहलेले किंवा ठरलेले नव्हते.
सूत्रसंचालक ख्रिस रॉकने या रंगमंचावरून अभिनेता विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवरून तिची खिल्ली उडवली. त्यावेळी पुरस्कार घेण्यासाठी आलेला विल स्मिथ पुरस्कार घेऊन परत जात होता. तो परत आला आणि त्याने ख्रिसच्या जोरदार कानफटात लगावली. क्षणभर प्रेक्षकांना काहीच कळाले नाही. त्यांना वाटले की हे नाट्य ठरवून घडवून आणले आहे. परंतू काही काळानंतर त्यांना याचे गांभिर्य लक्षात आले.
या प्रकारामुळे सूत्रसंचालक ख्रिस रॉकचे करियर आता संपणार असेच सगळ्यांना वाटत होते. परंतू प्रत्यक्षात उटलेच घडताना दिसते आहे. जगाच्या समोर खालेल्या या थपडेमुळे ख्रिस्त जगाच्या नजरेसमोर आला आहे. त्याच्या शोला मोठी गर्दी होऊ लागली आहे. खास त्याचा शो पाहण्यासाठी दुरवरून लोक येऊ लागले आहेत.
ख्रिस स्टॅं-अप कॉमेडियन आहे. त्याच्या शोला आता प्रचंड मागणी आहे. ऑनलाईन तिकीट मार्केटप्लेस टिकपिकने एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यांनी म्हणले आहे की गेल्या पुर्ण महिन्यात त्यांनी या शोची जेवढी तिकिटे विकली होती, त्यापेक्षा जास्त तिकिट त्यांनी केवळ एका रात्रीत विकली आहेत.
या वाढत्या मागणीमुळे या शोचे सर्वांत स्वस्त तिकीट ४६ डॉलर ( रु.३५०० ) इतके होते, आता हेच तिकिट ४११ डॉलरवर ( रु.३१,२७४ ) गेले आहे.
आता ख्रिस लवकरच टूरवर निघतो आहे. १ एप्रिलपर्यंत त्याचे ६ शो होणार आहेत. त्यानंतर तो अमेरिकेतील ३० शहरांचा दौरा करणार आहे, या सर्व शहरात त्याचे ३८ शो आताच निश्चित झाले आहेत.
त्या क्षणी ज्या थपडेने ख्रिसला अपमान झाल्यासारखे वाटले असेल, त्याच थपडेने आता त्याचे सगळे आयुष्य बदलून टाकले आहे.