राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
पाटस ते कानगाव जिल्हा मार्गावर असलेल्या पाटस रेल्वे स्थानकाजवळ दळवळणासाठी रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्गाचे काम रेल्वे विभागाने सुरू केले आहे. मात्र याठिकाणी भुयारी मार्ग हा दळवळणासाठी गैरसोयीचा व धोकादायक होणार आहे. भुयारी मार्गा ऎवजी उड्डाण पुल करण्याची मागणी कानगाव ग्रामपंचायत मागील दहा बारा वर्षापासून करीत आहेत. मात्र या मागणीला रेल्वे विभागाने केराची टोपली दाखवली आहे. तर पाटस ग्रामपंचायतीने मात्र बघ्याची भुमिका घेत हा प्रश्न गांर्भियाने घेतला नसल्याचे चित्र आहे.
पाटस ते कानगाव हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. दौंड व शिरूर तालुक्याला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. शिरूर,दौंड,बारामती व पुणे या शहराला दळवळणासाठी अंत्यत सोईस्कर आणि मध्यम मार्ग म्हणून यामार्गाचा वापर केला जातो. कानगाव व मांडवगण फराटा या गावांमधून गेलेल्या भिमा नदीवर पुल झाल्याने या रस्त्यावर जड वाहनांसह इतर वाहतुक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी व प्रवाशांना दळवळणासाठी अंत्यत सोईस्कर असा हा मार्ग झाला आहे. मात्र या रस्त्यावर असलेल्या पाटस रेल्वे स्टेशनवर रेल्वे गेट असल्याने याठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होत होती. रेल्वे गेट बंद झाल्यास याठिकाणी दोन्ही बाजुने वाहतुक कोंडी होत होती. यामुळे छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडत होत्या. त्यातच हा रस्ता अरूंद असल्याने दळवळणासाठी गैरसोयीचा हा रस्ता झाला होता. पाटस रेल्वे स्थानकाजवळ या रस्त्यावर असलेले रेल्वे गेट काढून रेल्वे उड्डाण पुल करण्याचा ठराव २६ नोव्हेंबर २०१२ रोजी तत्कालिन सरंपच पांडुरंग गवळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत मंजुर करण्यात आला होता. तसेच केंद्रीय रेल्वे विभागाचे केंद्रीय प्रमुख अधिकाऱ्यांनी पाटस रेल्वे स्थानकाला भेट दिली होती त्यावेळी ग्रामस्थांनी याबाबत ग्रामसभेचा ठराव व मागण्यांचे निवदेनही या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावेळी आमदार राहुल कुल हे ही उपस्थित होते. त्यानंतरही या मागणीसाठी कानगाव ग्रामपंचायतीने रेल्वे विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहारही केला आहे.
सध्या रेल्वे विभागाने दौंड तालुक्यातील लोहमार्गावरील रेल्वे गेट बंद करून त्याठिकाणी भुयारी मार्गाची कामे सुरू केली आहेत. पाटस ते कानगाव रस्त्यावरील रेल्वेगेट बंद करून मागील काही दिवसांपासून भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे. या भुयारी मार्गाला कानगाव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. भुयारी मार्गाऎवजी उड्डाण पुल करण्यात यावा अशी मागणी कानगाव ग्रामस्थांनी केली आहे. मात्र रेल्वे विभागाने या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. याठिकाणी उड्डाण पुल झाल्यास पाटस व कानगाव परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना दळवळणासाठी सोईस्कर
होणार आहे. भुयारी मार्ग अंत्यत अरूंद होणार असून दळवळणासाठी मोठी गैरसोय होणार आहे. ऊस वाहतुक व जडवाहने यामुळे याठिकाणी पुर्वी पेक्षा जास्त अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नागरीक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, रेल्वे विभागाने भुयारी मार्गासाठी कानगाव ग्रामपंचायतीला ना हरकत दाखला देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र तत्कालीन सरंपच यांनी मागील ठराव न पाहता रेल्वेविभागाला ना हरकत दाखला दिला. या सरपंचाच्या चुकीमुळे भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे. परिणामी कानगाव व पाटसकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
याबाबत कानगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल चाबुकस्वार म्हणाले की, पाटस कानगाव रस्त्यावर भुयारी मार्गाचे काम थांबावे व याठिकाणी उड्डाण पुल करावा यासाठी ग्रामपंचायत कमिटीने रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना सविस्तर परिस्थिती समजावून सांगितली, याबाबत निवेदनही दिले. मात्र त्यांनी उड्डाण पुलाच्या मागणीला गांर्भायाने घेतले नाही. या भुयारी मार्गास आमचा तीव्र विरोध असून रेल्वे विभागाने याठिकाणी उड्डाण पुल करावा.
तर माजी ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष गोरख सोनवणे म्हणाले की, याठिकाणी भुयारी मार्ग करणे अत्यंत चुकीचे आहे. हा भुयारी मार्ग करताना मोठा खड्डा पडणार आहे. परिणामी पावसाळ्यात या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचणार आहे. तसेच याची लांबी,रूंदी व उंची कमी असून अरूंद असा भुयारी मार्ग आहे. त्यामुळे दोन्ही बाजुच्या वाहनांची वाहतूक कोंडी होणार आहे. या मार्गावर वाहनांच्या वाहुतकीचा विचार केल्यास याठिकाणी उड्डाण पुलाची आवश्यकता आहे. कानगाव ग्रामस्थ मागील बारा वर्षापासून या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहे. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात जो त्रास दौंड तालुक्यातील गावांना भुयारी मार्गामुळे भोगावा लागत आहे तोच त्रास आता लोहमार्गावरील होत असलेल्या भुयारी मार्गामुळे होणार आहे. याचा विचार करून या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे व आमदार राहुल कुल यांनी या प्रश्नांकडे गांर्भायाने लक्ष घालावे आणि या प्रश्न मार्गी लावावा.