शिरूर : महान्युज लाइव्ह
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भरदुपारी जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ मार्च रोजी दुपारी बाळासाहेब बबनराव खेडकर ( रा. शिंदोडी, ता. शिरूर ) हे त्यांचे नातेवाईकांसह बँक आँफ इंडीया, न्हावरे या शाखेत ७,१३,००० रुपयाची कर्जाची रक्कम भरणेसाठी पिशवीत घेवून न्हावरे ते चौफुला डांबरी रोडने बँकेकडे पायी जात होते. यावेळी न्हावरा गावातून पाठीमागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून येऊन दोन अज्ञात व्यक्तींनी तक्रारदाराच्या हातातील पैशाची पिशवी जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती पिशवी फाटल्याने ७० हजार रूपये रक्कम मोटार सायकलवरील चोरांचे हाती लागली व उर्वरीत रक्कम रस्त्यावर पडली. सदर रोख रक्कम चोरून दोन्ही अज्ञात चोर मोटारसायकलवरून चौफुलाच्या दिशेने पळून गेले. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची गांभिर्याने दखल घेत शिरूर पोलिसांनी तपास सुरू केला होता. हा तपास सुरू असताना पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोघे आरोपी हे गुन्हा करून दौंड भागात फिरत असल्याची खात्री झाल्याने दौंड भागात सापळा रचून आरोपींना सिध्दटेक रोडवर पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. यावेळी विचारपूस केली असता आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. राकेश येशु गुडेट्टी (वय २६ वर्षे रा. कपराळ टिप्पा, ता-कावळी, जि-नेल्लोर राज्य-आंध्रप्रदेश ) व सँम्युअलराज तिमोती गोगुला ( वय २७ वर्षे, रा. ओझीकुपम, ता. कावेली, जि. चित्तुर, राज्य आंध्रप्रदेश , सध्या दोघे रा. दौड, ता. दौड, जि .पुणे ) अशी पकडलेल्या आरोपींची नावे असून या आरोपींविरोधात विविध पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
हा तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, अभिजित पवार, पोलीस हवालदार संजू जाधव, पो.हवा चव्हाण, पोलीस नाईक अनिल आगलावे, पोलीस नाईक नाथसाहेब जगताप, अण्णासाहेब कोळेकर, भोते, संतोष साळुंखे, विनोद काळे, होमगार्ड राहुल चौगुले यांनी केला आहे.