सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे यांसह त्यांचे पती वरकुटे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच बापूराव शेंडे यांनी अखेर मनगटावर घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रवेशाची जोरदार तयारी सुरु आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,खा.सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे,सरपंच बापूराव शेंडे यांचा पक्षप्रवेश सोहळा रविवारी ( दिनांक ३ ) रोजी सकाळी ८ वाजता वरकुटे खुर्द येथे होणार आहे. याच ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांची जाहिर सभादेखील होणार असल्याने या भव्य सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन बापूराव शेंडे यांनी केले आहे.
वरकुटे खुर्द मध्ये राष्ट्रवादीची तोफा कडाडणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाला धक्का देत सभापती शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ मनगटावर बांधण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची ताकद या भागात वाढणार आहे.
इंदापूरात गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेगा भरती होणार असल्याच्या चर्चेला तीन तारखेचा मुहूर्त मिळाला असून असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप माणूस इंदापूरात या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित राहत असल्याने अवघ्या तालुक्याच्या नजरा या प्रवेश सोहळ्याकडे आहेत.आपण टप्प्यात आणून कार्यक्रम करतो हे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उघडपणे जाहीर सभेत विरोधकांना सुनावले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत भरणे यांनी थेट भाजप खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गाव पातळीवर असणाऱ्या अंतर्गत कलहाचा नेमका फायदा घेत करेक्ट कार्यक्रम केला आहे.
सभापती स्वाती शेंडे व वरकुटे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच बापूराव शेंडे हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०१७ साली झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत काटी गणातून स्वाती शेंडे यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पंचायत समितीची निवडणूक लढवली.अटीतटीच्या लढतीत स्वाती शेंडे या विजयी झाल्या.यामुळे इंदापूर पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाची सत्ता आली.
सरपंच बापुराव शेंडे हे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. मात्र स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत कलहाचा या दांपत्याला त्रास सहन करावा लागल्याने या त्रासाला कंटाळून त्यांनी भाजपाला रामराम ठोकल्याची चर्चा आहे. परिसरातील सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची वृत्ती असल्याने ते परिसरात परिचित आहेत.
सध्या ग्रामपंचायती बरोबरच वरकुटे खुर्द विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याने या भागात राष्ट्रवादीची ताकद आता भक्कम होत आहे. शेंडे दाम्पत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने या भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.