किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
सणसर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक सभासदांना सहकारी सोसायटीकडून घेतलेल्या पीक कर्जाची रक्कम भरण्यासाठी तसेच कर्ज नवे-जुने करण्यासाठी चालू गळीत हंगामात छत्रपती कारखाना पेमेंट करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली. गेल्या काही वर्षातील सभासदांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि कौतुकास्पद ही बातमी आहे!(Admirable: This is the first time something good has happened! Members will get sugarcane payment from Chhatrapati factory by end of March)
चालू गळीत हंगामात एक मार्च ते 25 मार्च या कालावधीत गळीतास आलेल्या उसाचे पेमेंट 31 मार्च पूर्वी अदा करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. वरील कालावधीत गळीतास आलेल्या उसाला प्रति टन 2200 रुपये प्रमाणे रक्कम आज सभासदांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
त्यामुळे 31 मार्च पूर्वी पिक कर्ज भरणे तसेच नवे-जुने केल्यास ऊस उत्पादक सभासदांना शून्य टक्के व्याजाचा लाभ घेता येणार आहे. कारखान्याने 28 फेब्रुवारी पर्यंत गळीतास आलेल्या उसाचे प्रति टन 2200 प्रमाणे पेमेंट पंधरवडा पद्धतीने अदा केले आहे.
कारखान्याने आजपर्यंत दहा लाख 88 हजार 559 टन उसाचे गाळप पुर्ण केले आहे. त्यातुन 11 लाख 89 हजार 500 क्विंटल साखरेचे उत्पादन करून दैनंदिन साखर उतारा 12.37 टक्के तर सरासरी साखर उतारा 11 04 टक्के इतका आहे.कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून 5 कोटी 37 लाख 30 हजार 800 युनिट वीज निर्मिती केली असून त्यापैकी अंतर्गत विजेचा वापर वजा जाता तीन कोटी 49 लाख 47 हजार युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे.
अजूनही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात साधारण 1 लाख 25 हजार टन ऊस शिल्लक असून उपलब्ध संपूर्ण उसाचे गाळप करण्यात येणार आहे. त्यामुळे सभासदांनी ऊस गाळपाची चिंता करू नये व आपल्याच कारखान्यास ऊस द्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे.