पुणे : महान्यूज लाईव्ह
सध्या काश्मिर फाईल्स या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. काश्मिरमधील काश्मिरी पंडितांना रातोरात घरदार सोडून परागंदा व्हावे लागण्याची हद्यद्रावक कथा सांगणारा हा चित्रपट अंगावर शहारे आणणारा आणि दु:ख आणि संतापाने मन भरून जाणाराच असणार याच शंका नाही.
पण या दु:ख आणि संतापाच्या भावना अनावर झाल्यानेच कदाचित काश्मिर फाईल्स पाहून आलेल्या एका तरुणाचा मेंदुला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटल्याने मृत्यू झाल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे.
कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी मानणाऱ्या अभिजित शशिकांत शिंदे या ३८ वर्षाच्या युवकाने २१ मार्च रोजी आपल्या मित्रांसोबत रात्री ९ वाजताचा शो पाहिला. चित्रपट पाहून आल्यावर मित्रांसोबत जवळपास एक तास जळजळीत चर्चा झाली. त्यानंतर अभिजित त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला ब्रेन स्ट्रोक आला. मेंदुला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटल्याने तो बेशुद्ध पडला. सकाळी अभिजितचे वडिल खोलीत गेले असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. शेजाऱ्यांच्या मदतीने अभिजितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
अभिजितचा स्वभाव हा अत्यंत संवेदनशील होता. यामुळेच त्याला उच्च रक्तदाबाचा आजारही जडला होता. त्यातूनच ब्रेन स्ट्रोक आला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अभिजितच्या मृत्यूचा दोष चित्रपटाला देता येणार नाही. परंतू संवेदनशील स्वभावाच्या व्यक्तींनी असे चित्रपट पाहताना काळजी घेणे आवश्यक आहे, असे अभिजितचे वडिल शशिकांत शिंदे यांनी सांगितले.