पुणे : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांचे नाव घेऊन गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला गेला. आपल्याला पाहिजे तसाच तपास करावा यासाठी धमकावले गेल्याचा प्रकार हिंजवडी येथे सोमवारी ( ता. २८ ) रोजी घडल्याचे समोर आले आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार अश्रफ मर्चंट याच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.
आरोपी अश्रफ मर्चंट याने २२ जानेवारी रोजी सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने यांना फोन केला. ‘ मी पार्थभाऊंचा मित्र आहे, तुमच्याकडे अमित कलाटेचा विषय आहे का ? तुमचा त्या विषयात काय स्टॅन्ड आहे, मी आणि पार्थ पवार यांचे पीए सागर जगताप कलाटे यांचे खास मित्र आहोत. तुम्हाला मी सांगतोय ते ऐका, अमितचा काय विषय असेल तो तुम्ही मिटवून घ्या, नाहीतर विषय वरपर्यंत घेऊन जावे लागेल. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही मला तुम्हाला विचारून घ्यायला सांगितले आहे ‘ असे त्याने फोनवर नकुल न्यामने यांना सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
याबाबतच न्यामने यांनी २८ मार्च रोजी सोमवारी तक्रार दाखल केली आहे. उपमुख्यमंत्र्याच्या मुलाचे नाव घेऊन हा प्रकार केल्याने पोलीसांनी ही बाब गांर्भिर्याने घेतलेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर काटे करीत आहेत.