राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
राज्यातील महाविकास आघाडीने वीज महावितरण कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या खासगीकरणास महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मागील दोन दिवसांपासून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी संपावर गेले आहेत. दोन दिवसांपासून महावितरण कंपनीचे कार्यालये चालू असुन अधिकारी मात्र संपावर गेले आहेत. हीच परिस्थिती दौंड तालुक्यातील दौंड व दापोडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात पहावयास मिळत आहे. दरम्यान, महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारून आंदोलन सुरू केले आहे. मात्र याकडे वीज ग्राहकांसह तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठ फिरवली आहे. परिणामी महावितरण कंपनीचे पुढे काय होणार ? शासन काय निर्णय घेते आणि महावितरण कंपनीचे कर्मचारी काय भुमिका घेतात ? हे बघावे लागणार आहे.
महाविकास आघाडीने वीज महावितरण कंपनी खासगी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्रीमंडाळात चर्चा सुरू आहे. राज्यसरकारच्या या निर्णयाविरोधात सोमवार ( दि.२८ ) पासून महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती मधील एकूण ३९ संघटना या दोन दिवशीय संपात सहभागी झाल्या आहेत. या संपामुळे महावितरणची कार्यालये सुरू आणि काम मात्र बंद असल्याने कामानिमित्त येणाऱ्या वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. तर ग्रामिण भागात विद्युत उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने वीज खंडीत होऊन वीज दुरूस्तीअभावी ग्राहकांनाही अनेक ठिकाणी गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे चित्र होते. मात्र या गोष्टींची महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संप पुकारण्यापुर्वीच कल्पना दिली होती.
महावितरण वीज कंपनीचे जर खाजगीकरण झाले तर सर्व प्रथम सबसीडी हा प्रकार बंद होणार आहे. परिणामी घरगुती, औद्योगिक, शेती पंप, पोल्ट्री, पॉवर लूम, टेक्सटाइल, कुल्ड स्टोअरेज इत्यादी सबसीडीवर अवलंबुन असलेल्या सुविधा बंद होतील. या सर्व वर्गाची सबसिडी रद्द झाल्यास विजेचे दर वाढतील,जे सरासरी आत्ताच्या दराच्या ४ ते ५ पट दर वाढतील, खाजगीकरण झाल्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनांमधून कोणत्याही ग्राहकांना कोणत्या प्रकारचे कुठले ही आर्थिक सहाय्य मिळणार नाही किंवा शेतीपंप करिता मिळणारे अनुदान बंद होईल, विजेचे दर वाढल्यामुळे प्रॉडक्शन कॉस्ट वाढेल व अर्थातच महागाई वाढेल, जर महागाई वाढली तर प्रत्येक उद्योग धंदा चालविणे अडचणीचे ठरणार असून भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. याची मोठी किंमत वीज ग्राहक, उद्योजक, व्यापारी व शेतकऱ्यांना मोजावी लागणार आहे.
महावितरण कंपनीच्या या खासगीकरणाचा विरोधात कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक व ग्राहकांनी देखील या संपात सहभागी होण्याची आवश्यकता आहे, हा संप ग्राहकांना वेठीस धरण्यासाठी नसून सर्वांच्या हितासाठी आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या खासगीकरणाचा डाव उधळून लावण्यासाठी शेतकरी आणि ग्राहकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महावितरण कंपनीच्या संघटनांनी केले आहे.