बारामती : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पुर्ण झाले असून गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा विस्तारवाढ प्रकल्प सुरु करणार आहोत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली आहे.
विस्तारीकरण प्रकल्प प्रत्यक्षात सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व चाचण्या पुर्ण झाल्या आहेत. विस्तारीकरण प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर कारखान्याची गाळपक्षमता वाढणार असून दरदिवशी ८५०० टन ऊसाचे गाळप कारखाना करु शकणार आहे. सध्या कारखाना दरदिवशी ६३०० टन ऊसाचे गाळप करतो आहे.
गुढीपाडव्यापासून वाढणाऱ्या या क्षमतेमुळे या हंगामात राहिलेल्या ४५ दिवसात कार्यक्षेत्रातील नोंदलेला तसेच बिगरनोंदीच्या ऊसाचेही गाळप कारखाना करु शकणार असल्याचे जगताप यांनी म्हणले आहे.
चालु गळीत हंगामात आजपर्यंत ९ लाख ९१ हजार ८२४ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ११.६४ टक्के साखर उताऱ्यानूसार ११ लाख ४९ हजार ५० साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. यासोबत ७ कोटी ४१ लाख ७२ हजार ६६९ युनिट वीजेची निर्मिती केली असून ४ कोटी ५४ लाख ७१ हजार ३६ युनिटची विक्रीदेखील केली आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून ७५ लाख २७ हजार ४६ लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून ३२ लाख ३९ हजार ८२६ लिटर्स इथेलॉनचे उत्पादन घेतले आहे.
ऊसतोड करण्यासाठी ऊसतोड मजुरांकडून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी कारखान्याकडे येत आहेत. परंतू अशा प्रकारे कोणी पैशाची मागणी करत असल्यास त्याची लेखी तक्रार कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यांकडे करावी असेही जगताप यांनी म्हणले आहे.