दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत हौशीराम शितोळे यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना कोरोना योध्दा आणि आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
दैनिक नवभारत – नवराष्ट्र वृत्त समृहाच्या वतीने पुणे जिल्ह्यात कोरोना महामारीच्या काळात सरपंच, नगरसेवक,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी केलेल्या समाजहिताची काम केली आहेत.अशा लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाटस येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शितोळे यांनी कोरोना महामारीच्या कालावधीत गोरगरीब अशा तब्बल एक हजारच्यावर गरजु लोकांना मोफत धान्य वाटप करुन मदतीचा हातभार दिला होता. तसेच कोरोना काळात ग्रामीण भागातील नाभिक समाजाचे सलुन व्यावसायिकांचे दुकान बंद झाल्याने त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भभला होता. अशा परिस्थितीत शितोळे यांनी नाभिक समाजातील सुमारे ३६ कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत करुन सामाजिक सलोखा जोपासला. तसेच अनेकांना रुग्णालयासाठी आणि औषध उपचार करण्यासाठी सरळ हाताने आर्थिक मदत केली. जिल्हा परिषद सदस्य असताना शितोळे यांनी दुष्काळी भागातील गावांमध्ये पक्के रस्ते, ओढे नाले यावर बंधारे यांची कामे मार्गी लावली. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना मिळवून दिला तर पुणे सोलापूर महामार्गावर होणारा अपघातग्रस्तांना मदतीसाठी एक रुग्णावाहिकाही चालु केली होती. एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात पार पडलेल्या सोमवारी ( दि.२८) कार्यक्रमात राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कोरोना योध्दा आणि आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, पुणे नगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते.