माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
भोर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या नसरापूरसह सात गावांची एकत्र असलेल्या श्री गणेश विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीची स्थापने पासुनची बिनविरोध निवडणुकीची प्रथा यावेळी मोडीत निघाली असुन ५६ वर्षात प्रथमच निवडणकु होत आहे. यामध्ये तीन राखीव जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरीत संचालकपदाच्या दहा जागांसाठी दोन पॅनल मधुन १९ जण रिंगणात उतरले असून श्री बनेश्वर शेतकरी विकास पँनलचे उमेदवार रमेश कदम यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे.
नसरापूरसह निधान, सांगवी, माळेगाव, दिडघर, केतकावणे, विरवाडी या सात गावांची मिळून असलेल्या गणेश विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना १९६५ मध्ये झाली आहे. संस्थेचे भागभांडवल ६३ लाख असून २ कोटी २५ लाख कर्जवाटप आहे, एकुण सभासद ११६० आहेत. मतदान पात्र सभासद ८४० असून २५० सभासदांचे निधन झाले आहे. तर ५९० सभासद मतदान करणार आहेत. स्थापनेपासुन प्रत्येकवेळी संस्थेची निवडणुक बिनविरोध पार पडली. मात्र यावर्षी इच्छुकांची संख्या वाढल्याने शेतकरी विकास परिवर्तन पँनल व श्री बनेश्वर शेतकरी विकास पँनल या दोन पँनलमध्ये निवडणुक होत आहे. दोन्ही पँनलच्या वतीने सातही गावामधील शेतकरी सभासदांच्या गाठीभेट घेण्यावर भर असून चिन्ह, माहीतीपत्रके, झेड्यांसह रॅलीव्दारे जोरदार प्रचार चालु आहे.
प्रथमच दोन पॅनलमध्ये होत असलेल्या चुरशीच्या निवडणुकीत श्री बनेश्वर शेतकरी विकास पँनलचे तीन उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत. उर्वरीत कर्जदार प्रतिनिधी गटातुन रमेश शंकरराव कदम, तानाजी दळवी, चंद्रकांत धावले, गोरक्ष धावले, संतोष कृष्णराव कदम, दत्तात्रय़ निगडे,अनिल एकनाथ शेटे, शामराव शिळीमकर व महिला राखीव मधुन कौशल्या अरविंद सोंडकर हे सर्व कपाट व छत्री चिन्ह घेऊन लढत देत आहेत.
शेतकरी विकास परिवर्तन पँनलकडुन कर्जदार प्रतिनिधीमधुन दिनेश बांदल, रघुनाथ बबन दिघे, अंकुश निवृत्ती पांगारे, मोहन कृष्णा पांगारे, दिपक बबन सोंडकर,नामदेव तानाजी झेंडे,संदिप मारुती झेंडे व महिला राखीवमधून सुनिता अर्जुन बांदल, शांताबाई दत्तात्रय दिघे हे उमेदवार कपबशी चिन्ह घेऊन लढत देत आहेत. तर महिला राखिवमधून वैशाली भोसले या छत्रीचे चिन्ह घेऊन स्वतंत्र लढत देत आहेत.
मंगळवार २९ मार्चला नसरापूर प्राथमिक शाळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.