दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील हातवळण येथे गुऱ्हाळ काम करणाऱ्या मजुराच्या एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून अपहरण केल्याची घटना घडली होती. पाटस पोलीसांनी अवघ्या दहा दिवसांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला. उत्तर प्रदेश येथील सहारनपुर जिल्हातून या मुलीला सोडवून आणले. याप्रकरणी एका आरोपीला अटक केले आहे. बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अशी माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
हातवळण येथील गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजुराची १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहारण केल्याची फिर्याद १६ मार्च रोजी यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तसेच याच गुऱ्हाळावरील एका ३२ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार ९ मार्च रोजी दाखल झाली होती. याप्रकरणाचा तपासाचा छडा पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी व त्यांच्या पथकाने अवघ्या दहा दिवसाच्या आत लावून आरोपी व मुलीला सुखरूप आणले आहे. याप्रकरणी कन्हैया वेदपाल या आरोपीला अटक केली आहे.या आरोपीला सोमवारी ( दि.२८) बारामती जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१७ वर्षीय पीडित मुलीला अपहरण करून उत्तर प्रदेशमध्ये नेले असल्याची प्राथमिक माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामिण पोलीस अधीक्षक डॅा.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे,पोलीस हवालदार संजय देवकाते, पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर,गणेश मुटेकर आदींच्या पथकाने शुक्रवारी ( दि.२५ ) उत्तर प्रदेश गाठले. पीडित मुलगी ही उत्तर प्रदेश मध्ये सहारनपूर जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाल्याने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन पीडित मुलीला आरोपीच्या ताब्यातून सोडविले.
तसेच यवत पोलीस स्टेशनला एका ३२ वर्षीय महिला बेपत्ता तक्रार दाखल असलेली महिलाही उत्तर प्रदेश मधील उज्जैन या गावी असल्याची माहिती मिळाल्याने तिचा शोध घेवून तिलाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.