जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक संप
माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
अव्वलकारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नती मागील दोन वर्षापासुन होत नसल्याने तसेच महसूल सहाय्यकाचे रिक्तपदे भरण्यात येत नसल्याने राज्यभर आंदोलन करण्यात आले असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रलंबित मागणीसाठी आंदोलन करण्यात आले असून प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास ४ एप्रिलपासून बेमुदत संप करणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्हयातील सर्व महसूल कर्मचारी, पदोन्नत नायब तहसिलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई, कोतवाल कर्मचारी यांचा संपात सहभाग घेऊन सामुदायीक एका दिवसाचा लाक्षणिक संप आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून निदर्शने करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष दिपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली, जिल्हा सरचिटणीस सचिन तांबोळी, विभागीय कार्याध्यक्ष अंकुश आटोळे, सहचिटणीस, विकास औताडे, वैशालिनी गोसावी, विनायक राऊत, प्रदिप जावळे, गोपाळ राठोड, निर्मला चौधरी, शारदा गोरे, नामदेव शिंदे यांनी उपस्थित महसूल कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
शासनासोबत झालेल्या बैठकांमध्ये शासनाने तत्वतः मान्य केलेल्या मागण्या सहा वर्षाचा कालावधी होऊनही राज्य शासनाकडून अद्यापपर्यंत कोणताही शासन निर्णय निर्गमित न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी नाईलाजास्तव २१ मार्चपासून टप्प्याटप्प्याने आंदोलनास सुरुवात केली असून आज सोमवारी दि. २८ रोजी राज्यातील सर्व महसूल कर्मचारी यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आहे.
संपामध्ये जिल्हयातील तब्बल तेराशे कर्मचारी सहभागी होते. संप १०० टक्के यशस्वी करण्यात केला असून प्रलंबित असलेल्या विभागनिहाय संपूर्ण पदोन्नती प्रस्तावास तातडीने मान्यता प्रदान करुन पदोन्नतीचे आदेश निर्गमीत करावे. अन्यथा दि. ४ एप्रिलपासून बेमुदत संप करणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली यांनी दिली.