बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथील आमराई ही गरीबांची वस्ती समजली जाते. या परिसरातील दोन युवकांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर मोठे यश मिळविले आहे . तुमची जिद्द आणि प्रयत्न हे जर प्रामाणिक असतील तर मिळालेलं यश नक्कीच अफाट असत आणि असच अफाट आणि उत्तुंग यश सुरज सुभाष मोरे आणि शुभम मिलिंद शिंदे यांनी मिळवल आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये या दोघांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
विशेष हे दोघेही अतिशय सामान्य कुटुंबातील असून सुरजचे वडील हे सेंट्रिंगचे काम करतात, तर शुभमचे वडील हे गॅरेजमध्ये कामाला आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबांची परिस्थिती बेताची असताना देखील न डगमगता सुरज आणि शुभम यांनी आपल्या बुद्धी कौशल्य आणि जिद्दीच्या जॊरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून आमराईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे.
बारामतीच्या मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक
दरम्यान, सुरज आणि शुभम या दोघांनीही पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान पटकवल्यानंतर आमराई परिसरातील शेकडो नागरिकांनी फटक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. इतके वर्षे जी लोक बारामतीतील आमराई परिसराकडे वाईट दृष्टीकोनातून बघत होती. त्या लोकांसाठी सुरज आणि शुभमचे यश हे सणसणीत चपराक असल्याची भावना काल आमराई परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या मनात होती.
बाबासाहेबांचे विचार आणि आई-वडील हेच प्रेरणा
भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार,आणि आई-वडिलांची प्रेरणा या मुळेच आम्ही आज या उंची पर्यंत येऊन पोहचलो, आपल्याला जर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न खऱ्या अर्थाने जर साकार करायचे असेल तर सर्वात आधी आपल्याला शैक्षणिक दृष्टया सक्षम होऊन मोक्याच्या जागा काबीज करणं गरजेचं असल्याचे यावेळी सुरज आणि शुभम यांनी सांगितले, दरम्यान इथून पुढे आमच्या दोघांचीही जबाबदारी अधिक वाढली असून येत्या काळात आमराई परिसरातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टया सक्षम करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आणि प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.