इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉली तिरकी झाली. या ट्रॉलीतीन ऊसाच्या मोळ्या अंगावर पडून एका दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे घडली आहे.
बोराटवाडी येथील संजय मधुकर फडतरे यांनी याबाबत तक्रार दिली असून त्यांच्यासोबत दुचाकीवरून जात असलेल्या बोराटवाडीच्याच नारायण रामचंद्र जाधव यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे.
नारायण व संजय दुचाकीवरून नीरा भीमा कारखान्यावरून बोराटवाडी गावाकडे निघाले होते. नारायण हे दुचाकी चालवत होते. शहाजीनगरजवळ रेडा रोडवर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर भरधाव वेगाने येत होता. या ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचे टायर बाहेर निघाले, ट्राली अक्षरश: पिळली गेली. या ट्रॉलीतील ऊसाच्या मोळ्या नारायण जाधव यांच्या अंगावर पडून ते गंभीर जखमी झाले. आजुबाजूच्या माणसांनी ऊसाच्या मोळ्या बाजूला काढून त्यांना उपचारासाठी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू तेथे पोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.
ऊसाच्या मोळ्या भरलेल्या दोन तीन ट्रॉल्या, अशिक्षित बेफिकीर ट्रॅक्टर चालक यामुळे दरवर्षी अशाप्रकारचे अपघात ऊस कारखान्यांच्या परिसरात होत असतात. परंतू कोणीही त्याकडे गांभिर्याने पहात नाही. या ट्रॅक्टर ट्रॉलींच्या बेजबाबदार वाहतुकीवर नियंत्रण आणल्याशिवाय हे अपघात थांबणे अवघड आहे.