मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेले दोन दिवस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रात आहेत. जिथे गडकरी असतात तिथे हजारो कोटींच्या कामांची चर्चा असते, आणि जोडीला मनमोकळ्या गप्पा असतात.
नितीन गडकरी यांची एक स्टाईल आहे. पण या स्टाईलने ते ज्यावेळी एकएक किस्से सांगतात, त्यावेळी समोरचा जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहतो. एका ज्वेलरी शॉपसंबंधीत कार्यक्रमात त्यांनी असाच एक किस्सा सांगितला.
राजकीय कारकर्त्यांना विमानतळावर नेत्यांच्या स्वागतासाठी जाण्याची सवय असते. ही एक प्रकारची राजकीय संस्कृतीच आहे. परंतू गडकरीनी सांगितले की, ते कधीच कोणत्या नेत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले नाहीत. विमानतळावर हार घेऊन जायचे, तिथे विमानातून उतरलेल्या नेत्याच्या गळ्यात हार घालायचा असा प्रकार आपण कधीही केला नसल्याचे ते म्हणाले.
फक्त लता मंगेशकर आणि अटलबिहारी वाजपेयी या दोघांच्याच गळ्यात आपण स्वत: हार खरेदी करून घातल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले. आपल्या स्वागतासाठी विमानतळावर येणाऱ्या कार्यकर्त्यालाही आपण ‘ तुला दुसरे काही काम नाही का ‘ म्हणून फटकारत असल्याचेही त्यांनी सांगितले.