दौंड : महान्यूज लाईव्ह
बार्शी येथील फिल्टर मशीन विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्याला पुणे – सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दौंड तालुक्यातील खडकी येथे अज्ञात चोराने अडीज लाखांचा ऎवज लुटला आहे. बॅगेमधील सोन्या चांदीच्या मौल्यवान दागिन्यांसह रोख रक्कम लुटून चोरटे पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड तालुक्यातील खडकी येथील साई सागर हॉटेल समोर शनिवारी ( दि.२६ ) ही घटना घडली. याबाबत दौंड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिल्टर मशीन विक्री करणारे व्यापारी अक्षय सतिश चौरे ( रा.बार्शी, जि.सोलापुर ) हे पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या खडकी येथे थांबले होते.
यावेळी त्यांच्या बॅगेमधील एक सोन्याचे गंठण, साखळीतील दोन तोळे वजनाचे पत्याची डिजाईन सोने, चार सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे अडीज ग्रॅमचे कानातील टॉप, एक मंगळसुत्र, चांदीचे ब्रेसलेट, एक जोडवी, पैंजण एक जोड़, तसेच रोख रक्कम ५० हजार असा एकुण २ लाख ५० हजार ४०० रुपयांचा ऎवज अज्ञात चोरानी लुटून पोबारा केला.
याबाबत अक्षय चौरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.