मुंबई : महान्यूज लाईव्ह
सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा उगारणारे कडक पोलिस खाते आयपीएलसमोर मात्र एकदम नरम झाले आहे. अब्जावधीची कमाई करणारी आयपीएल स्पर्धा आयोजित करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे १४ कोटी ८५ लाख रुपये थकवले आहेत. ही रक्कम यापूर्वी पुरविलेल्या बंदोबस्ताची होती. ही रक्कम द्यावी यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल ३५ स्मरणपत्रे पाठविलेली आहेत. पण या पत्रांना मुंबई क्रिकेट असोसिएशनने कसलीही किंमत दिलेली नाही. मात्र ऐवढे सगळे असूनही मुंबई पोलिस यंदाच्या आयपीएल सामन्यांसाठी बंदोबस्त पुरविण्यासाठी दक्ष झाले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनील गलगली यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तरात ही माहिती उघड झाली आहे. मुंबईमध्ये वानखेडे किंवा ब्रेवॉर्न मैदानात मुंबई क्रिकेट असोसिएशन क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत असते. या सामन्यांसाठी मु्ंबई पोलीस सशुल्क बंदोबस्त पुरवत असतात. अशाच यापूर्वी पुरविलेल्या बंदोबस्ताची १४.८५ कोटीची रक्कम थकीत आहे. ही रक्कम २०१३ ते २०१८ या काळातील आहे.
याखेरीज २०१९ – २० या काळातील झालेल्या सामन्यांसाठीचे शुल्काची मागणी अद्याप करण्यात आलेली नाही. या सामन्यांना किती शुल्क आकारावे याचे आदेश अद्याप राज्य सरकारने दिलेले नाहीत. हे आदेश द्यावेत यासाठीही गृह विभागाच्या सचिवांना नऊ वेळा स्मरणपत्रे मुंबई पोलिसांनी पाठवलेली आहेत.
ऐवढे सगळे होऊनही मुंबई पोलिस पुन्हा एकदा बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. एखाद्या सर्वसामान्यासाठी एवढा कळवळा मुंबई पोलिस कधी दाखवतील का, हाच यातला खरा कळीचा प्रश्न आहे.