मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील आमदारांना मुंबईत मोफत घर देणार या जितेंद्र आव्हाण यांच्या घोषणेनंतर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या या संदर्भातील उल्लेखानंतर राज्यात सगळीकडे या संदर्भात चर्चा रंगली होती. अनेक आमदारांनी आम्हाला घरे नकोत, असेही म्हणले होते. सर्वसामान्य नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत नाराजी दिसून येत होती. आता सरकारने याबाबत स्पष्टीकरण म्हणा किंवा सारवासारव म्हणा, करायला सुरुवात केली आहे.
आता अजित पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना खास आपल्या शैलीत यावर उत्तर दिले आहे.
‘ काल मुख्यमंत्र्यांनी आमदारांना घरे देऊ असे म्हणले होते, पण मिडियाने ‘ मोफत ‘ घरे देऊ असे सांगितले. ‘ असे सांगत मिडियावर खापर फोडले. ‘ पण मी सांगतो, कुणालाही घर मिळणार नाही. ज्यांना मुंबईत घर नाही, अशांना घर, अस ते होतं. मला आणि माझ्या बायकोला तर घर मिळूच शकत नाही. ‘ असेही ते म्हणाले आहेत.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे, आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत व बांधकाम खर्च याची किंमत संबधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, असे त्यांनी म्हणले आहे.
मोफत घराचा हा मुद्दा सरकारच्या चांगलाच अंगाशी आला होता. त्यामुळे आता सारवासारव करत या निर्णयापासून मागे हटण्याचा प्रयत्नात सरकार दिसते आहे.