माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
महाडच्या दौऱ्यावर असलेले भाजप नेते किरीट सोमय्या हे मुंबईहून मीडियाचा ताफा घेऊन महाडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी वार्तांकनसाठी आलेल्या स्थानिक पत्रकारांना सोमय्या यांनी भेदभाव करत अपमानास्पद वागणूक देत हाकलून दिले. या घटनेचा रायगड प्रेस क्लबने जाहीर निषेध केला असून या घटनेबद्दल भाजपने जाहीरपणे माफी मागेपर्यंत भाजपच्या स्थानिक बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पत्रकारांमध्ये मुंबईची मिडिया आणि ग्रामीण मिडिया असा भेदभाव करून पत्रकारांमध्ये वाद निर्माण करण्याचा, फूट पाडण्याचा राजकारणी कायम प्रयत्न करीत असल्याचे चित्र निर्माण होत असून महाडमध्ये हेच चित्र दिसले. सध्या किरिट सोमय्या कोकण दौऱ्यावर आहेत. ते महाड येथे आले असता अगोदर मुंबईच्या मिडियाला घेऊन ते हॉटेलात गेले. तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकारांवर डाफरत त्यांनी त्यांना बाहेर काढून अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा रायगड प्रेस क्लबने निषेध केला आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तसेच भोर तालुका पत्रकार संघ ( पुणे ) यांनी देखील घटनेचा निषेध केला आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी याबाबत बोलताना सांगितले की, मुळात मिडिया आता मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. मोठी वृत्तपत्रे, चॅनल्सचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात कार्यरत आहेत. ही प्रतिनिधी चांगली शिकलेली, उत्तम बातमीदार आहेत. स्थानिक पातळीवरील बातम्या ही पत्रकार मंडळी आपआपल्या माध्यमांना सातत्याने पाठवत असतात. त्या छापल्या देखील जातात. मग किरिट सोमय्या सारखे नेते जेव्हा ग्रामीण भागात येतात तेव्हा त्यांना मुंबईतील मिडियाचा ताफा का लागतो ? असा सवाल करत देशमुख यांनी केला आहे.
माध्यम समुहांनी देखील आपल्या स्थानिक पत्रकारांवर अविश्वास दाखवत मुंबईतील पत्रकारांना का नेत्यांबरोबर पाठवावे ? यातून मुंबईतील मिडिया आमच्याबरोबर आहे, स्थानिक पत्रकारांची गरज काय, अशी घमेंड या नेत्यांमध्ये निर्माण होते. आणि ते स्थानिक पत्रकारांवर अरेरावी करीत राहतात. अशा घटना सातत्याने घडत असतात. मुंबईतील प्रतिनिधी जेव्हा येतात तेव्हा ते सर्व माहिती स्थानिक पत्रकारांकडूनच घेतात आणि स्वतःच्या नावाने रिपोर्ट तयार करतात. असे असले तरी आज महाडमध्ये जे घडले त्याबाबत ताफ्यातील पत्रकारांच्या प्रतिक्रिया थंड होत्या. महाडच्या पत्रकारांना बाहेर काढल्यानंतर ताफ्यात असलेल्या मुंबईतील एकाही पत्रकाराने त्याला विरोध केला नाही, असे समजते. हे योग्य नाही. पत्रकार खेड्यातले असले तरी ते आपले सहकारी आहेत असे आमच्या मुंबईकर मित्रांना का वाटत नाही ? फोडा आणि झोडाच्या या कटाला आपण बळी का पडतो ?
महाडमधील घटनेबद्दल भाजपने जाहीरपणे माफी मागेपर्यंत भाजपच्या स्थानिक बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लब आणि स्थानिक पत्रकारांनी घेतला आहे. याबाबत राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकार नाराज असल्याचे चित्र उमटत आहे. याबाबत ठोस भूमिका घेतली गेली नाही तर अशा घटना वारंवार घडत राहतील आणि वांझोटे निषेध करीत बसण्यापेक्षा वेगळे काही आपल्या हाती राहणार नसल्याचे एस. एम. देशमुख यांनी सांगितले आहे.