राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातून गेलेल्या भीमा नदीच्या पात्रात मागील काही महिन्यांपासून राजकीय वरदहस्ताने फायबर आणि सेक्शन बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा व वाळू वाहतुक केल्या प्रकरणी दौंड शहरसह श्रीगोंदा तालुक्यातील तब्बल १४ वाळू चोरांवर दौंड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी तीन जणांना ताब्यात घेतले असून अकरा जण पसार आहेत त्यांनाही लवकर अटक करण्यात येईल,अशी माहिती दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
दौंड शहराजवळील कचरा डेपो परिसरात भीमा नदीच्या पात्रात आणि आसपासच्या भागात फायबर व सेक्शन बोटीच्या सहाय्याने बेसुमार बेकायदा वाळू उपसा सुरू होता. महसूल विभाग व दौंड पोलीसांनी शुक्रवारी ( दि. २५ ) संयुक्त कारवाई करीत भीमा नदीपात्रातील तब्बल २० ते २२ बोटी जप्त करीत त्या जागीच नष्ट करून धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे दीड कोटी रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला होता.
मात्र महसूल आणि पोलीस प्रशासनाचे पथके कारवाईसाठी आल्याची चाहूल लागताच संबंधित वाळू माफिया हे पसार झाले होते. या प्रकरणी
महसूल विभाग व दौंड पोलीसांनी स्थानिक माहिती घेत तब्बल १४ वाळू चोरांवर दौंड पोलीस ठाण्यात गौण खाण आणि खनिज तसेच पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत वाळू उपसा व चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
मुकेश सोनवणे,अमोल जगताप, वैभव सोनवणे, नवनाथ जगताप, किशोर विठ्ठल शेलार, आण्णासाहेब जगताप, चिक्या सोनवणे, बिया सोनवणे, राज सोनवणे, संजय सोनवणे, मिलिंद जगताप, ( रा. भिमनगर ता.दौंड, जि.पुणे ), प्रशांत भालेराव ( रा. दौंड ) तसेच गोद उर्फ श्रीकांत मगर, प्रशांत मगर ( दोघेही रा. गार ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर ), अशी गुन्हे दाखल केलेल्या वाळू चोरांची नावे आहेत.
दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे स्वतः आपल्या पथकासह सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भीमा नदीच्या पात्रात कारवाईसाठी उतरले होते. महसूल विभाग व दौंड पोलीस यांच्या पथकाने बेकायदा वाळू उपसाचा पंचनामा करीत व स्थानिक चौकशी करीत या आरोपींची नावे निष्पन्न केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे व तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.