पुणे : महान्यूज लाईव्ह
वारजे माळवाडी येथील एका सराफ दुकानात काल चोरी झाली. भरदिवसा चोरट्यांनी संपुर्ण दुकान लुटून नेले, पण कुणालाही तपास लागला नाही. चोरटे अगदी आरामात चोरी करून निघून गेले आहेत.
आनंदकुमार चुनीलाल वर्मा यांचे वारजे येथील एनडीए रोडवर गणपती माथा परिसरात शमीम पॅलेस या इमारतीत सराफी दुकान आहे. त्यांच्या शेजारचाच गाळा काही व्यक्तींनी मसाला व्यवसाय सुरु करण्याच्या बहाण्याने भाड्याने घेतला. या दुकानात फर्निचर बनविण्याचे काम सुरु होते. आनंदकुमार वर्मा दुपारी दुकान बंद करून घरी आले. त्याच दुपारी अडीच ते पावणे पाचच्या दरम्यान या दोन्ही दुकानांच्या मधील सामायिक भिंतीला भलेमोठे भगदाड पाडण्यात आले. तेथून आत प्रवेश करून चोरट्यांनी सर्व दागिने घेऊन पळ काढला.
चोरट्यांनी तब्बल १ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ज्वेलर्सचे मालक वर्मा हे सायंकाळी दुकान उघडण्यासाठी परत आले तेव्हा त्यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे समजले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके तसेच गुन्हे शोध शाखा व स्थानिक पोलीसांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे.