मुंबई : महान्यूज लाईव्ह
पंजाबमधील नव्या आम आदमी पक्षाच्या सरकारने दोन दिवसांपूर्वीच भ्रष्टाचारासंदर्भात माहिती देण्यासाठी विशेष नंबर जाहीर केला होता. आता या नंबरवर आलेल्या तक्रारीवरून तहसील कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे.
मीनू हे या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून नोकरी देण्याचा बहाणा करून ४.८ लाख रुपये घेतल्याचा तिच्यावर आरोप आहे. जालंधर जिल्ह्यातील सुरेंदर कुमार याने ही तक्रार केली होती. सुरेंदर कुमारची मीनूशी एका लग्न समारंभात भेट झाली. त्यावेळी तिने सुरेंदरच्या मुलीला सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले आणि त्याकरिता साडेतीन लाख मागितले. सुरेंदर कुमार यांची आर्थिक स्थिती गरिबीची असल्याने त्यांनी टप्प्याटप्प्याने ही रक्कम देऊ असे सांगितले आणि मीनूनेही ते मान्य केले.
हे सगळे बोलणे १० महिन्यांपूर्वी झाले होते. त्यानंतर सुरिंदर यांनी मीनूला पैसे द्यायला सुरुवात केली. १४ मे २०२१ रोजी ४००००, त्यानंतर चार दिवसांनी ८०००० दिले गेले, त्याचे कर्न्फमेशनही मीनूने दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी १.१ लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यामधून पाठवले, त्यानंतर पु्न्हा एकदा ५०००० रुपये आपल्या मुलाच्या खात्यातून पाठवले.
यानंतर दोन वेळेस ५०००० रुपये दिले. यानंतर १९ जून २०२१ ला सुरिंदरच्या मुलीच्या व्हाटसएपवर नोकरी मिळाल्याचे नेमणूकपत्र आले, पण ते नंतर बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर सुरिंदर यांनी मीनूशी भेट घेतली. तिने सुरुवातीला पैसे परत देते असे सांगितले. पण त्यानंतर तिने उलट सुरिंदर आणि त्यांच्या कुटुंबाला धमक्या देण्यास सुरुवात केली.
मात्र आता या हेल्पलाईनमुळे आम्हाला न्याय मिळाला, असे सुरिंदर यांनी सांगितले. मीनूला दिलेल्या या रकमांचा पुरावा तसेच व्हिडिओदेखील सुरिंदर यांनी या हेल्पलाईनद्वारे पाठविला होता. त्या आधारेच ही कारवाई करण्यात आलेली आहे.
दरम्यान मीनू ही दोन महिन्याची गर्भवती आहे. तिला आता दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.