मुंबई : महान्यूज लाईव्ह
शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांचे राहते घर आणि जमीन अशी ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करून ईडीने त्यांना आणखी एक झटका दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहूणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर ईडीचा शिवसेनेला हा आणखी एक दणका आहे.
प्रताप सरनाईक यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात ईडीने माझे ठाण्यातील हिरानंदानी येथील राहते घर आणि मिरा रोड येथील २५० चौ. मीटरची जमीन अशा दोन मालमत्ता जप्त केल्यासंदर्भात मला आणि माझ्या कुटुंबाला नोटीस पाठवली आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असून ईडीने केलेल्या कारवाईविरोधात मी ३० दिवसात कोर्टात अपील करणार आहे. कोर्ट जो निर्णय देईल त्याच्या अधीन राहून पुढील कारवाई होईल, असे त्यांनी म्हणले आहे.
याबाबत किरिट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २०१३ मध्ये उघड झालेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्यासंदर्भात मी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. हा घोटाळा ५६०० कोटी रुपयांचा होता. प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर आस्था बिल्डर या दोघांनी त्या ५६०० कोटी रुपयांपैकी २१६ कोटींची चोरी केली. त्यातील ३५ कोटी रुपये सरनाईक यांच्या खात्यात आले. त्यातून त्यांनी टिटवाळ्यात ७८ एकर जमीन घेतली. ती जमीन ईडीने अॅटॅच केली असून आता २ फ्लॅट अटॅच केले आहेत. आता प्रताप सरनाईक यांनाही अटक होणार, असेही किरीट सोमय्या यांनी म्हणले आहे.
२०१३ च्या एनएसईएल घोटाळा प्रकरणी ईडीने संचालकांसह २ जणांविरोधात मनी लॉंड्रींग प्रतिबंधक कायद्यानूसार चौकशी सुरु झाली होती. या प्रकरणी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्यात आली होती. १३ हजार गुंतवणूकदारांची ५६०० कोटी रुपयांची रक्कम या घोटाळ्यात अडकली आहे. आरोपींनी या घोटाळ्यातील रकमेचा उपयोग रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड व इतर बेकायदेशीर कामांसाठी केल्याचा आरोप आहे.
अर्णब आणि कंगना यांच्याविरोधात बोलल्याने माझ्यावर ईडीने कारवाई केली, असे प्रताप सरनाईक यांनी म्हणले आहे.