बारामती : महान्यूज लाईव्ह
यावर्षी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये अल्प उत्पन्न गटातील, आर्थिक दुर्बल घटकातील आणि चिकाटी व परिश्रमातून ध्येय समोर ठेवून यश मिळवणारे अनेक युवक फौजदार बनले आहेत. त्यांच्या यशाचे संपूर्ण राज्यात कौतुक आहे. मात्र या कौतुकात बारामती तालुक्याचेही अनेक हिरे झळकले आहेत.

बारामती शहरातील आमराईपासून झालेली सुरुवात बाबुर्डी ते अगदी तालुक्यातील पूर्वेकडील काटेवाडी लिमटेकच्या टोकापर्यंत ग्रामीण व शहरी भागातील अनेक जण एमपीएससीच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. येत्या काही काळात हे सर्वजण राज्याच्या विविध भागात कायदा आणि सुव्यवस्थेचे कामकाज पाहू लागतील. प्रत्येकाची एक अशी वेगळी कथा आहे. यामध्ये कोणी लग्नानंतर फौजदार बनले आहेत, तर कोणी मजुरी करून फौजदार बनले आहेत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा आहेत आणि त्या प्रत्येक कथा राज्यातील नव्या पिढीसाठी अनुकरणीय अशाच आहेत.
होय, अशातीलच एक कहाणी आहे, बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील निलेश पोमणे या युवकाची! बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात सध्या कौतुकाचा विषय बनलेल्या बाबुर्डीचा युवा सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांचा निलेश हा भाऊ! गावचे माजी सरपंच, बारामती बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे यांचा निलेश हा मुलगा! अर्थात ही राजकीय कुटुंबातील ओळख बाजूला सोडून प्रशासकीय मार्गाने धावत राहिलेल्या निलेशने आपल्या कुटुंबाच्या व गावाच्या यशामध्ये अभिमानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे!
निलेशला एक अधिकारी बनवण्यासाठी वडील बाळासाहेब पोमणे यांनी खूप यातना सोसल्या आहेत. गरीब परिस्थिती असून पण आपल्या मुलांना समाजामध्ये चांगला माणूस बनण्यासाठी बाळासाहेब खोमणे यांनी खूप मेहनत घेतली समाजकारणात अग्रेसर असल्यामुळेच गावाने त्यांना नेतृत्वाची संधी दिली केवळ त्यांनाच नाही त्यांच्या पुढील पिढीलाही हि संधी दिली मात्र एकेकाळी रस्त्यावर खडी पसरवण्याचे काम करणाऱ्या बाळासाहेबांचे पांग निलेश या मुलाने फेडले.
मुलांच्या शिक्षणासाठी बाळासाहेब पोमणे यांनी घेतलेली ही मेहनत मुलांनी त्यांच्या कर्तृत्वाने सार्थ ठरवली. बाळासाहेब यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचा आघाडी चा कार्यकर्ता असून सध्या बाबुर्डी चा सरपंच म्हणून काम करतो. अल्पवयातच सरपंच झालेला तो बारामती तालुक्यातील पहिला सरपंच असून, त्याने गावाच्या हितासाठी वेगवेगळे अफलातून असे निर्णय घेतले आहेत.
वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन आपल्याला कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे आहे असा पण आणि संकल्प करून निलेश गेल्या वर्षापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करत होता त्यात त्यांनी यश मिळवले असून 2019 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 494 जागांसाठी झालेल्या फौजदार की च्या परीक्षेत तो एन टी एस सी या प्रवर्गासाठी आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
निलेश पोमणे याने बाबुर्डी गावातील पहिला पीएसआय होण्याचा मान मिळवला आहे. लोणीकाळभोर येथील विश्वशांती विद्यालयात मरीन इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करून कोल्हापूर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या निलेशने पीएसआय होऊन आई वडिलांचे स्वप्न साकार केले. 2019 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 494 जागांचा पोलीस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल आज लागला.