सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
ऊसतोड मजूर दारू पिऊन येतो आणि ऊस तोडणी करत नाही या कारणावरून चिडलेल्या ऊस वाहतूकदाराने त्याच्या ट्रॅक्टर वरील ऊसतोड मजुरास उसाने मारहाण केली. या महाराणीत अस्वस्थ झालेल्या ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी ऊस वाहतूकदाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. ऊसतोड मजूर हा भिल्ल जमातीतील असल्याने या वाहतूकदारा विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेत गणेश मधुकर लोखंडे (वय तीस वर्षे राहणार बरकतपुर ता. कन्नड जि. औरंगाबाद) या मजुराचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा मजूर इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे ऊस तोडीचे काम करत होता. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात लोखंडे याची पत्नी अलका गणेश लोखंडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी या प्रकरणी अमोल हनुमंत माने (रा. कात्रज ता. करमाळा जिल्हा सोलापूर) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अलका गणेश लोखंडे व गणेश मधुकर लोखंडे हे दोघे पती-पत्नी कात्रज येथील अमोल हनुमंत माने यांच्याकडे ऊस तोडणीचे काम करत होते. अमोल हनुमंत माने यांचा ट्रॅक्टर साखर कारखान्याकडे ऊस तोडणी व वाहतुकीसाठी असून त्याच्यावरील ऊसतोड मजूर म्हणून गणेश व अलका हे दोघे काम करत होते. भरणेवाडी येथे काल ऊस तोडणीचे काम चालू होते.
त्यावेळी गणेश मधुकर लोखंडे हा दारू पिऊन येतो आणि ऊस तोडणी करत नाही या कारणावरून चिडून जाऊन अमोल हनुमंत माने याने गणेश यास उसाने बेदम मारहाण केली. यामध्ये पोटात व पाठीवर बेदम मारहाण झाल्याने गणेश गंभीर जखमी झाला व त्याला त्रास होऊ लागला. त्यानंतर गणेश याची पत्नी अलका हिने गणेश याला उसाच्या कोपीवर नेले. रात्री गणेशचा त्रास वाढत गेला मात्र कोणीच जेवण न करता झोपी गेले.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणी साठी उठण्याची लगबग सुरू असताना गणेश हा उठत नसल्याने व गणेशाला जास्तच त्रास होऊ लागला, म्हणून हा त्रास कमी व्हावा म्हणून अलका हिने त्याला चहा करून दिला. मात्र चहा न पिता तो तसाच झोपी गेला. आज सकाळी दिवस उजाडल्यानंतर अलका हिने पाहिले असता कोणतीच हालचाल होत नसल्याने तिला शंका आली.
तिने ऊस वाहतूकदार अमोल हनुमंत माने यास व गणेश याचे मामा वाल्मीक गायकवाड यांना बोलावून घेतले. त्या दोघांनी गणेश यास लासुर्णे येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी गणेश याची तपासणी केली असता, गणेशचा दवाखान्यात येण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा त्यावरून अलका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातूरे करत आहेत.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भोसले यांनी ही घटना घडल्याची माहिती कळाल्यानंतर आज शिरूर येथून थेट वालचंदनगर पोलिस ठाणे गाठले व या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली व गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाली.