नानाची टांग
एके दिवशी काय घडलं?
साळू बोलली बाळूला…
चल जाऊ वाळूला..
अरे वाळू कसली घेऊन बसला..
तो पत्थर काळा सोना..
हो हो..काळा काळा सोना..!
सोन्यासाठी गोळा झाला सारा गावगन्ना….
अरे, टोणगे झाले गोळा सगळे..
बगळे झाले गोळा..!
मग थोरला साहेब आला..म्हणला,
माझे पाच, तुझे दहा…गोळा करू गल्ला…!
रस्ते लागले खचू सारे, गाव खचू लागला..
खादी बरोबर खाकीलाही वाण अन गुण लागला..!!
मग, एके दिवशी काय घडलं?…
इतिहासाचा एक पन्ना म्हणे या तालुक्याला जोडला..
स्वराज्यातल्या आजोबाने जीव येथे सोडला…
राजे महाराजांची म्हणे पत इथे उरली..
वाळूमाफियांनी सारी अब्रू वेशीला बरी टांगली..
कोण एक दादा इथं सांगून जरा गेला…
५१ हजार कोटींचा होईन इथं गल्ला..
कोकणातल्या नारोबानं पाय जरी पसरला…
डाळजच्या तात्यानं त्याला कोर्टात हिसका दिला…
५१ हजार कोटीचं सोनं तसंच दबून राहीलं..
गावागावाच्या कडंनं हळूहळू निघू लागलं..
तवा इथला एक साहेब थोरला, त्यानं हे थांबवलं…
थांबवण्या हे सारं.. त्यानं जंग जंग पछाडलं..
एकदा म्हणे त्यानं अर्ध्या राती नदीत उडी घेतली…
त्याच्या उडीची वाळूमाफियांनी मग भीती जरा घेतली..
पण एके दिवशी काय घडलं?
एके दिवशी थोरला साहेब इथून बदलून गेला..
आणि आली साळू अक्का आणि बोलली बाळूला…
आता नको भीती कोणाची, आपलाच आहे ठेला..
आपल्याला भीती घालायला कोणाचा बा व्याला?
मग सारे टोणगे शहारले, एकदम शहारून म्हणाले,
अरे, भीती कसली बाबा, सायेबच आपला झाला…
त्याचे पाच, आपले दहा, जुळवू सगळाच जुमला…
मग पुन्हा रस्ते लागले खचू सारे, गाव खचू लागला..!!
एके दिवशी काय घडलं?
गावगन्ना माफिया झाले, रातीचा दिस झाला..
सकाळचा देवासमान बाळू, रातचा सैतान दिसू लागला…
सरदार होता वीस हजारी..ब्रास- ब्रास मोजू लागला…
शहाच्या काठी काळं सोनं, ढिग जमवू लागला..
कोणाचा हा ढिग म्हणायची पंचाईत की हो झाली..
साहेबांच्या थोरल्या आदेशापुढं सारी नरमाय लागली..
एके दिवशी काय घडलं?
एके दिवशी आक्रितच घडलं…
अवं वळचणीचं पानी पुन्यांदा आड्याला गेलं..
थोरला साहेब, त्याला दुनिया अपुरी…
पर खाकीतल्या शिपायानं चोरी की हो धरली..
चोरीचा होता मामला…आजवर होता दबला..
इथून तिथून मग शिपाई जोरात बोंबालला..
बोंब गेली दारोदारी…टोणगे झाले भयभीत..
थोरल्या साहेबानं मग शिपायाला विचारली जनरित..
जनरितीचं मानत नाही, शिपायी बाणेदारपणे बोलला..
थोरल्या साहेबांनं मग थेट लॉकअपच गाठला…
बसून गेला लॉकापमधी…म्हणला, अटक कर मला..
मग मात्र शिपायाचा डर जरा वाढला…
शिपायानं त्याच्या सायबाला आडोशाला गाठला…
लॉकापमधला मामला सारा कानावर घातला..
सायबानं मामला जरा धीरानं घेतला…
चोरीचाच होता..चोरीनंच मिटला…
पण चोरीच्या मामल्याची धग लागली तालुक्याला…
का?
तर, इतिहासाचा एक पन्ना होता, तालुक्याला जोडला..
स्वराज्यातल्या आजोबाने जीव येथे सोडला…
राजे महाराजांची म्हणे पत इथे उरली..
वाळूमाफियांनी सारी आब वेशीला की हो टांगली..
त्या दिवशी घडलं असं जगायेगळं विपरित…
सुटली सारी जनरीत…उरलं नाही जनहित..
रक्षक होतात भक्षक…तिथं कसली नित-मित..
मग काय झालं?
कुणाचाच कुणाला पायपोस काही उरला नाही…
अन इंदापूरच्या राजाला परवाची ही दिवाळी माहितीच नाही…!
कायकर्ते सारे जगलेच पाहिजेत..हाच आमचा नारा आहे..
वाळूच्या जिवावर बाळू आता गावाला नडणार आहे…!!
वाळूच्या जिवावर बाळू आता गावाला नडणार आहे…!!
–सुरेश मिसाळ,महान्यूज लाईव्ह इंदापूर.










