राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
भीमा नदीच्या पात्रात दौंड शहराजवळ मागील काही दिवसांपासून राजकीय वरदहस्ताने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने सुरू असलेल्या वीस फायबर व सेक्शन बोटी असा अंदाजे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला. नदीच्या पात्रातील बेकायदा वाळू उपसा करणारे अड्डे महसूल व पोलिस प्रशासनाने आज उध्वस्त केले आहेत. अशी माहिती तहसीलदार संजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
दरम्यान, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासून ही कारवाई सुरू केली. कारवाईची चाहूल लागताच संबंधित वाळू माफिया पसार झाले. या कारवाईने शहरासह ग्रामीण भागातील वाळु माफियांचे धाबे दणाणले असून संबंधितांनी धसका घेतला आहे. दौंड तालुक्यातून भीमा नदी वाहते. जिल्ह्यात सर्वाधिक वाळू दौंड तालुक्यात आहे. शहरासह ग्रामीण भागात नदीच्या पात्रात फायबर यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा केला जातो. मागील काही महिन्यांपासून शहराजवळील कचरा डेपो परिसरातील नदीच्या पात्रात फायबर यांत्रिक बोटीच्या सहाय्याने शहरातील काही वाळू माफिया बेकायदा वाळू उपसा करीत होते. शहरसह तालुक्यातील काही बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्ताने दिवसरात्र बेसुमार वाळू उपसा व वाळू वाहतूक सुरू होती. परिणामी परिसरातील नागरिकांना यांचा नाहक त्रास होत असल्याने संबंधित वाळू माफियांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी होत होती. त्यानुसार दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी शुक्रवारी ( दि. २५ ) पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह भीमा नदीचे पात्र गाठले. यावेळी या पथकाने शहराजवळील कचरा डेपो परिसरातील यांत्रिक बोटीने सुरू असलेले बेकायदा वाळू अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत १० फायबर आणि १० सेक्शन बोटी अशा एकुण २० बोटी जप्त करून त्या जागीच नष्ट करण्यात आल्या. त्यापैकी चालू अवस्थेत ४ फायबर आणि ४ सेक्शन बोटी आणि उर्वरित बंद अवस्थेतील सर्व बोटी नष्ट करण्यात आल्या. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही कारवाई संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती.
दरम्यान संबंधित बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम अद्याप सुरू आहे.