दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड ते कुरकुंभ रस्त्यावर वनविभागाच्या दौंड विभागाच्या रोप वाटिकेसमोर एका अज्ञात तरूणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे, ही माहिती दौंड पोलीसांनी दिली.

दौंड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर दौंड कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत व वनविभागाच्या हद्दीत राखीव वन क्षेत्रात शुक्रवारी ( दि. २५ ) एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृत तरुणाच्या डोक्यामागे आणि हनुवटीवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत.तसेच या मृत तरुणाच्या अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट व काळी रंगाची पॅण्ट आहे. दोन किंवा तीन दिवसांपूर्वी हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दौंड पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून दौंड पोलीस पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, मृत्य तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.हा मृत तरुण दौंड तालुक्यातील आहे की बाहेरील आहे याबाबतचा शोध पोलीस घेत आहेत.