राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या थकित बिलावरून मागील काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने वीज तोड व विद्युत पुरवठा बंद करून कारवाई करण्याची मोहीम राबवली होती. त्यानंतर आता महावितरण वीज कंपनीच्या दौंड कार्यालयाने घरगुती आणि व्यापारी थकीत वीज बिले वसुलीसाठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
अनेक घरगुती ग्राहकांवर वीज पुरवठा खंडीत करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून ही मोहीम राबवली आहे. महावितरण कंपनीने थकीत कृषी पंपाच्या वीजबिलावरून केलेल्या कारवाईमुळे शेतकरी आणी महावितरण वीज कंपनी यांच्यात मोठा संघर्ष पहावयास मिळाला. महावितरण विरोधात शेतकरी संघटनासह भाजपाने आक्रमक पवित्रा घेत तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, धरणे आंदोलन व महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलने केली गेली. तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याच्या घटना घडल्या. तालुक्यात भाजप किसान मोर्चाने महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरत तीव्र आंदोलन उभारले होते. मात्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तीन महिने कृषी पंपाच्या थकीत वीज बिल कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत थकीत कृषी पंपाच्या वीज बिल भरण्याची मुदत तीन महिन्यांनी पुढे ढकलली. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात दिलासा मिळाला.
एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना महावितरण कंपनीने आपला मोर्चा आता घरगुती आणि व्यापारी थकित वीज ग्राहकांकडे वळवला आहे. मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीने घरगुती आणि व्यापारी थकीत वीज बिलांच्या संदर्भात थकीत वीज बिले वसुली साठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महावितरण कंपनीने अनेक घरगुती ग्राहकांच्या वीज जोड तोडुन वीज पुरवठा खंडीत करीत वीज मीटर जप्त करून कारवाई केली आहे. घरगुती व व्यापारी वीज ग्राहकांनी थकित वीज बिले त्वरित भरावीत असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
दरम्यान, याबाबत दौंड महावितरण वीज कंपनीचे ग्रामीण शाखा अभियंता जीवन ठोंबरे म्हणाले की, कोट्यवधी रुपयांची घरगुती व व्यापारी वीज बिले थकीत आहेत. ही वीज बिले गेली अनेक वर्षांपासून भरलेली नाहीत. ही थकीत वीज बिले वसुलीसाठी आम्ही वीज पुरवठा खंडीत करुन कारवाई सुरू केली आहे. ज्या ग्राहकांची थकीत वीज बिले आहेत त्यांनी त्वरित ती भरावीत आणि कारवाई टाळावी. ग्राहकांनी आपली थकित वीज बिले भरावे आणि महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन जीवन ठोंबरे यांनी केले आहे.