मुंबई : महान्यूज लाईव्ह
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी केली आहे.
गेले अनेक दिवस देवेंद्र भुयार हे संघटनेच्या कामापासून दूर असल्याच्या तक्रारी संघटनेचे कार्यकर्ते करीत होते. राष्ट्रवादी पक्षाशी त्यांची जवळीक वाढत चालली होती. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांपासून ते दूर राहत होते. हिवरखेड येथे राजु शेट्टी यांच्या सभेच्या वेळी भुयार यांची हकालपट्टी करा असे बॅनर लावण्यात आले होते. त्यावेळी राजु शेट्टी यांनी याबाबत विचार करतो अशी भूमिका घेतली होती.
आता राजु शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी यांच्या सोशल मिडियावर ‘ धन्यवाद ‘ अशी पोस्ट करून या घोषणेला प्रतिसाद दिला आहे.
पक्षातून हकालपट्टी झाल्याने तसेच एकमेव आमदार असल्याने भुयार यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची आमदारकी शाबूत राहणार आहे. त्यामुळे भुयार सध्यातरी निर्धास्त आहेत.