पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे शहरातील मध्यवस्तीत जंगली महाराज रोडवरील मुलींच्या शाळेत शिरून एका ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला गेला होता. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेतील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
मंगेश तुकाराम पदुमले ( वय ३६ ) असे या आरोपीचे नाव असून तो शाळेजवळील एका शोरुमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
ही पिडीत मुलगी बुधवारी सकाळी शाळेत गेली असता आरोपी शाळेत आला. त्याने या मुलीशी ओळख असल्याचे दाखवून या मुलीला शाळेच्या बाथरुममध्ये नेले. तिथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. कोणालाही काही न सांगण्याची धमकी देऊन तो तिथून निघून गेला.
या मुलीने घडलेली घटना आपल्या मैत्रिणीला सांगितली. त्यांनतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. शाळेच्या व्यवस्थापनानेही तातडीने दखल घेत मुलीच्या आईवडिलांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही तातडीने शाळेत पोचले.
पोलिसांनी या मुलीने सांगितलेल्या वर्णनानूसार रेखाचित्र तयार केले. त्या रेखाचित्रावरून त्यांनी आरोपीचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश बामगुडे यांच्या पथकाने जनवाडीतील एका दारु गुत्यावर आरोपीला पकडले.