बारामती : महान्यूज लाईव्ह
आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा पेन ड्राइव बॉम्ब फोडला. या बॉम्ब मधील एक प्रकरण बारामतीशी संबंधित असून बारामतीतील निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या कथित संपत्तीचा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित करून मोठी खळबळ उडवून दिली आहे.( Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis detonated another pen drive bomb today. Fadnavis has raised the issue of alleged assets of retired Baramati police officer Isaac Bagwan in a case related to the bombing.)

पोलीस सेवा दलातील निवृत्त सहाय्यक आयुक्त ईसाक बागवान हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्या बंधूंच्याच बाबतीत स्टिंग ऑपरेशन झाल्याने एक नवीन माहिती पुढे आली आहे. बारामतीतील बागवान यांच्या 42 एकर जमिनीबाबत फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले असून, मुंबई आणि पुण्यातील संपत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आज अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या पेन ड्राईव्ह संदर्भातील माहिती देताना इसाक बागवान यांच्या संदर्भातील एक प्रकरण उपस्थित केले आणि बारामतीसह पुणे जिल्ह्यात आणि पोलीस दलातही खळबळ उडाली.
फडणवीस यांनी इसाक बागवान यांच्या बारामतीतील संपत्तीवर आरोप केले नाहीत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले यामध्ये फडणवीस म्हणाले, गट क्रमांक 69 मधील 16 हेक्टर 48 आर म्हणजे 42 एकर बिगरशेती जमीन बागवान यांची आहे. बारामती मध्ये आता एन ए जमीनीचे दर काय आहेत त्याची सर्वानाच कल्पना आहे. अजितदादा तुम्हालाही याची कल्पना असेल असे म्हणत फडणवीस यांनी हा बॉम्ब फोडला.
बारामतीतील अशोकनगर सह इतर ठिकाणीही व मुंबईपर्यंत त्यांच्या जमिनी व जागा असल्याचा उल्लेख व दावा फडणवीस यांनी केला. भाऊ नसीर बागवान, भावजय बिलकिस बागवान यांच्या नावावर जमिनी खरेदी केल्या व बागवान नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी फक्त एक साधा अर्ज देऊन या सर्व जमिनी व संपत्ती आपल्या नावावर केलेल्या आहेत असाही आरोप फडणवीस यांनी केला.
फरीद मोहम्मद अली वेल्डर हा कोण आहे?
फडणवीस यांनी आज केलेल्या आरोपांमध्ये या जमिनीपेक्षाही फरीद मोहम्मद अली वेल्डर या व्यक्ती संदर्भात घेतलेले आक्षेप चर्चेचे ठरले. यासंदर्भात फडणवीस यांनी अशी माहिती दिली. 2017 मध्ये दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकर याला ठाणे क्राईम ब्रांचने अटक केली होती. त्यावेळी इकबाल कासकर याने सांगितले होते की, फरीद मोहम्मद अली वेल्डर याला आपण पैसे दिल्याचे कासकर याने सांगितले होते. त्यावेळी त्या वेल्डरवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र फरीद याची चौकशी झाल्यानंतर अवघ्या सात दिवसात तो मृत्युमुखी पडला.
फरीद मोहम्मद आली बिल्डर याने 41 लाख रुपयाला मुंबईतील संपत्ती विकत घेतली व ती जमीन दहा वर्ष नावावर ठेवल्यानंतर 30 डिसेंबर 2020 रोजी फरीद मोहम्मद अली वेल्डर याच्या मुलाने ही सगळी संपत्ती बागवान यांना बक्षीसपत्र करून दिली. यात एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
यामध्ये नसीर बागवान यांचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. यामध्ये संबंधित नेता बारामतीला कशाप्रकारे गेला याची माहिती असून हे नेते बारामतीचे नाहीत, मात्र मुंबईचा हा मोठा नेता असून तो बारामतीला कसा गेला आणि कशाप्रकारे या प्रकरणाची मध्यस्थी केली? या संदर्भातील सर्व स्टिंग ऑपरेशन नसीर बागवान यांच्याकडून करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान हाजी मस्तानच्या भावाचा उल्लेख करत फडणवीस यांनी या प्रकरणात इसाक यांनी त्याला सोडल्यानंतर इसाक यांना मुंबईत सेंट्रल परिसरात एक फ्लॅट मिळाला होता असाही आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित व मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून कशा पद्धतीने जमिनी घेतल्या गेल्या असा आरोप करत फडणवीस यांनी हे प्रकरण नवाब मलिक यांच्यापर्यंत पोहोचवले. यावेळी फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर व उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांना वाचवण्याचा अट्टाहास का? अशी विचारणा सरकारला केली.
दरम्यान या संदर्भात अद्याप कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आले नसून सरकार यात काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. मात्र फडणवीस यांनी दोन्ही पेन ड्राईव्ह सादर करताना अप्रत्यक्षपणे बारामती लक्ष्य केली आहे.