नगर : महान्यूज लाईव्ह
त्याने गुन्हेगारी क्षेत्रात कधीच जाऊ नये म्हणून एक शेतकरी त्या पारधी कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला. स्वतःची जमीन त्याला खरेदी करून दिली तीदेखील उधारीवर! एवढेच नाही, तर त्या जमिनीचे पैसे फेडण्यासाठी त्या पारधी कुटुंबाने बोकड खरेदी केले. ते वाढवून त्याच्या पैशातून जमिनीचे पैसे फेडले. शेतीची स्वप्ने पाहून हिरवं सोनं पिकविणाऱ्या शशिकांत चव्हाण या पारधी समाजातील शेतकऱ्यानं कष्टाच्या आणि कामाच्या जोरावर स्वाभिमानाची लढाई जिंकली. ( In the village of Dagdi Bardgaon in Karjat taluka, a story has been told about this stone breaking and bringing the blessing of green gold, not yellow. Shashikant Chavan made agriculture a success by adding value to hard work. Karjat police inspector Chandrasekhar Yadav had come today to see the farm.)
कुसळे उगवणाऱ्या माळरानावर त्याने फुलवली द्राक्षांची बाग आणि ती पाहण्यासाठी कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जेव्हा पोलिसांची सायरन असणारी गाडी घेऊन गेले तेव्हा शशिकांतच नव्हे तर त्याचं कुटुंब देखील आनंदाने शहारुन गेलं..!
कर्जत तालुक्यातील दगडी बारडगाव या गावात ही पत्थराला पाझर फोडणारी आणि पिवळ्या नाही तर हिरव्या सोन्याची बरकत आणणारी कहाणी घडली आहे. शशिकांत चव्हाण यांनी अत्यंत कष्टाने व कष्टाला मूल्याची जोड देत शेती यशस्वी करून दाखवली. ती शेती पाहण्यासाठी आज कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आले होते. येताना ते एकटे आले नाहीत, तर अत्यंत सन्मानाने त्यांनी आपल्या हाताने शशिकांत चव्हाण या शेतकऱ्याला फेटा बांधला आणि त्चायां सन्मान त्याच्या शेतीच्या बांधावर जाऊन केला.
ही कहाणी आहे शशिकांत टिकल्या चव्हाण या पारधी समाजातील परिवर्तनवादी शेतकऱ्याची. काबाडकष्ट करून माळरानावर अगदी हिऱ्यांसारख्या मण्यांची द्राक्षबाग फुलवणाऱ्या आणि विशेष म्हणजे कुटुंबातील मुलांनाही बी.ए.बी.एड, एम.ए.डी.एड असे उच्च शिक्षण देऊन सन्मानाने जगणाऱ्या पारधी कुटुंबाची!
आज शशिकांत चव्हाण यांना भेटण्यासाठी खुद्द कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आले. तसे पाहायला गेले तर आत्तापर्यंतच्या काळामध्ये फासेपारधी समाज आणि पोलिस यांचे नाते जणू चोर पोलिसांचे! जणू पिढ्यानपिढ्या हाच शिक्का बसलेला इतर ठिकाणी आपल्या पाहायला मिळतो. मात्र आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणारे आणि शेतीमध्ये नवशिक्या शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय असा प्रयत्न करणारे शशिकांत चव्हाण हे आजच्या काळात सर्वांसाठी आदर्शच! शशिकांत चव्हाण यांनी यावेळी चंद्रशेखर यादव यांना त्यांच्या शेतकरी होण्याचा प्रसंग सांगितला, तेव्हा तर चंद्रशेखर यादव देखील काही काळ भारावून गेले!
पंचवीस वर्षांपुर्वी भाऊसाहेब वाकळे या शेतकऱ्याने पारधी कुटुंबाला ही जमीन विकत दिली.पारधी कुटुंबाला जमीन देणे हे त्याकाळीही धाडसच. त्या जमीन खरेदीचा किस्सा स्वतः शशिकांत चव्हाण यांनी सांगितला. ते पारधी कुटुंबातील असल्याने त्याकाळी ससे तसेच अन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी या शेतात यायचे. त्यावेळी ‘असले प्रकार बंद करून मोलमजुरी करून इथेच का राहत नाही? असा सल्ला मुळ मालक भाऊसाहेब वाकळे यांनी दिला होता.
मात्र जमीन घेण्यासाठी इतके पैसे मी कुठून आणणार? असा केविलवाणा प्रश्न चव्हाण यांनी केला. त्यावेळी वाकळे यांनी पारधी कुटुंबाच्या नावावर उधारीवरच जमीन करून दिली होती.
मुळ शेतमालक भाऊसाहेब वाकळे यांनी २५ वर्षांपुर्वी उपजीविकेसाठी एवघ्या ५ हजार ३०० रुपयांत एकरभर जमीन पारधी कुटुंबाला दिली होती. जमिनीचा सौदा झाला खरा पण, जवळ पैसेच नसल्याने बाजारातून बोकड विकत आणुन ते मोठे करून विकून आलेल्या नफ्यात जमेल तसे पैसे देऊन तब्बल १२ वर्षानंतर जमिनीचा व्यवहार पुर्ण झाला. वाकळे यांच्या मोठेपणामुळे व विश्वासामुळे आज हे पारधी कुटुंब सन्मानाने जीवन जगत असल्याचे त्यांनी सांगितले.
ही कहाणी ऐकल्यावर यादव यांनी पारधी कुटुंबाला माणुस म्हणुन जगण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या भाऊसाहेब वाकळेंचाही सन्मान केला. एरव्ही गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या पारधी समाजात हातात बेड्या ठोकण्याऐवजी एका कुटुंबातील कर्ता पुरुषाला चक्क डोक्यांवर फेटा अन् हातात नारळ देण्याचे आगळे-वेगळे दिशादर्शक काम ‘यशोगाथा’ उपक्रमातून एका उपक्रमशील पोलीस निरीक्षकाने केले आणि काही काळ तेथील वातावरण भारावलेले झाले.
‘आज ही खाकी तुमच्या सन्मानासाठी उभी आहे,तुमचे काम पाहून गुन्हेगारीच्या वाटेवर असणारे सन्मानाने जगतील, तुमच्या कामाची प्रेरणा मिळेल’ यादव यांच्या या वाक्यावर चव्हाण यांनीही मान डोलावली. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पत्रकार विजय सोनवणे, दत्ता उकिरडे, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, मनोज लातुरकर, ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संविधान प्रचारक तुकाराम पवार, भाऊसाहेब वाकळे, गणेश कदम आदी उपस्थित होते.