माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती शिवरे ( ता. भोर ) येथील शिवशक्ती तरुण मंडळाच्या मावळ्यांनी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शेकडो तरुणांनी दिलेल्या ‘ जय जिजाऊ, जय शिवराया ‘ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यामुळे शिवरे परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
शिवशक्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुरंदर तालुक्यातील मल्हारगडावरून शिवज्योत आणून शिवजयंती साजरी केली. सायंकाळी गावातून भव्य शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष व तरुण-तरुणी मोठय़ा उत्साहात सहभागी झाल्या होत्या. जयंतीची सुरुवात छत्रपती शिवाजी यांच्या पुतळय़ास मंडळाच्या पदाधिकार्यांनी हारार्पण करून झाली. शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास वंदन करून भव्य शोभायात्रा प्रारंभ झाली. परिसरात शिवशाहीचे वातावरण तयार करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती मिरवणूक प्रारंभ करून मल्हारगडावरून वाजतगाजत येऊन शिवरे गावात समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत समवेत महिला -पुरुष व युवाशक्ती सहभागी झाली होती. या मिरवणुकीत युवक-युवतींचे संच, बालक-बालिकांनी बाल शिवाजींचा व जिजाऊंचा पेहराव करून सहभाग घेतला. वाई येथील रुद्रभैरव ढोल ताशा पथकाच्या शिलेदारांनी केलेली प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानधन देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान २०० हून अधिक संख्या असलेल्या शिवशक्ती तरुण मंडळाची कार्यकर्त्यांनी एक दिलाने शिवजयंती साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली असून ग्रामस्थही सहकार्य करत आहे. आत्तापर्यंत किल्ले सिंहगड, राजगड,प्रतापगड, रायगड, शिवनेरी, जंजिरा, पुरंदर, तोरणा, वैराटगड, कल्याणगड आदी किल्ल्यावरून यशस्वी दौड करत मंडळांनी साजरी केलेल्या शिवजयंती आजही आठवणीत असल्याचे बोलले जात आहे.