मुंबई : महान्यूज लाईव्ह
हे आर्थिक वर्ष पुर्ण होण्याच्या ९ दिवस अगोदरच भारताने ४०० अब्ज डॉलर निर्यातीचे उद्दिष्ट पुर्ण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिट करून ही बातमी देशवासियांना दिली असून त्यांनी देशातील शेतकरी, कामगारांसह सर्वांचे अभिनंदन केले आहे.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण निर्यातीचे ठरविलेले उद्दिष्ट पुर्ण करू शकलेलो आहोत.
कोरोनाचे संकट यावर्षीही बराच काळ टिकून होते. तरीदेखील निर्यातीचे हे उद्दिष्ट पुर्ण झाले आहे. निर्यात वाढल्याचा परिणाम म्हणून रुपया मजबूत होणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेवरही चांगला परिणाम होणार आहे.
२०१८ – १९ मध्ये ही निर्यात ३३२ अब्ज डॉलरपर्यंत पोचली होती. त्यानंतर कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात २०१९ – २० मध्ये ३१४.३ अब्ज डॉलर तर २०२० – २१ मध्ये २९०.६ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाले होते. यावर्षी आतापर्यंत ४०० अब्ज डॉलरचे उद्दिष्ट पुर्ण झाले असून हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत ४१० अब्ज डॉलरपर्यंत निर्यात जाऊ शकते.
काय काय निर्यात करतो आपण ?
या निर्यातीत छोट्या, मोठ्या मशिनरी किंवा मशिनरी पार्ट्सच्या निर्यातीचा मोठा वाटा आहे. अमेरिका या वस्तूंचा सर्वात मोठा ग्राहक आहे.
पेट्रोल आणि पेट्रोलियम वस्तूंची निर्यातही आपण करतो. कच्चे पेट्रोल आयात केले जाते. आपल्या येथील रिफायनरीजमध्ये त्यावर प्रक्रिया करून त्यापासून पेट्रोल, डिझेल आणि विविध उपपदार्थ बनविले जातात, त्यानंतर पेट्रोल, डिझेलसह इतर पदार्थांची इतर देशातही निर्यात केली जाते. ही निर्यात यावर्षी जवळपास दुप्पट झाली आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे पेट्रोलियम पदार्थांचा निर्यातीतील वाटा खुपच वाढला आहे.
याखेरीज हिरे, रत्ने आणि सोन्याचांदीचे दागिने, विविध प्रकारची रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, हातमागाचे कापड, ज्यूट, प्लास्टिक, चामडे आणि चामड्याच्या वस्तूंचीही निर्यात केली जाते.
शेतीमालामध्ये यावर्षी साखरेची निर्यात खुप मोठ्या प्रमाणावर झाली. महाराष्ट्रातील नागपूरहून संत्री, चांदोलीतून काळ्या तांदूळाचीही मोठी निर्यात झाली.
अर्थात भारताची आयात आणि निर्यातीमध्ये अजूनही खुप अंतर आहे. भारताची आयात जानेवारीपर्यंत ६१६ अब्ज डॉलर होती. मार्चपर्यंत ती ७०० अब्ज डॉलरपर्यंत पोचू शकते.
परंतू ज्याप्रमाणे दरवर्षी निर्यात वाढते आहे, त्यानूसार हे अंतर पुढील काही वर्षात कमी होण्याची शक्यता आहे.