सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
कोरोना नंतरच्या काळात कौटुंबिक नाती जवळ आली असे वाटत असतानाच प्रत्यक्षात पूर्वीच्या एकलकोंडेपणाचा दुष्परिणाम सध्या समाजात सर्वत्र पाहायला मिळतो आहे. जिथे नवविवाहिता आत्महत्या करताना दिसत आहेत, त्याच पलीकडे घरातील मुले आईबापांच्या जीवावर उठताना दिसत आहेत. इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्येही काल अशीच घटना घडली. ( The father comes in drunk every day. The incident took place in Madanwadi area of Bhigwan, pune police station at around 2 in the morning.)
वडील दररोज दारू पिऊन येतात. रात्र रात्र घराबाहेर हाकलून देतात, याचा प्रचंड त्रास होऊन कंटाळा आलेल्या मुलाने पहाटेच्या दोन वाजण्याच्या सुमारास वडिलांच्या डोक्यात दगड घालून वडिलांचा खून केल्याची घटना भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदनवाडी परिसरात घडली. याप्रकरणी खुनी दिवट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी येथील राजेंद्र छगन कुंभार याने भिगवम पोलीस ठाण्यात येऊन आपल्या वडिलांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला अशी माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर भिगवण पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली. भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, फौजदार विनायक दडस, रुपेश कदम, सुभाष रुपनवर, नाना वीर, समीर करे, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीन मुलाणी, आप्पा भांडवलकर यांचे पथक या ठिकाणी पोहोचले.
घटनेची माहिती सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला राजेंद्र छगन कुंभार याच्याकडेच पोलिसांची संशयाची सुई वळली.
कारण राजेंद्र कुंभार याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता, त्यामुळे पोलिसांचा संशय बळवला. याच ठिकाणी पोलिसांनी खाक्या दाखवला आणि त्याने पोपटासारखे घडाघडा बोलून या खुनाची कबुली दिली. या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली पोलिसांनी राजेंद्र कुंभार याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.