सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने एक नवीन आपला आदर्श घालून दिला. आजकालच्या दुनियेत जे कोणी फ्लेक्सवर उगवणारे नेते आहेत, जे त्यांचा वाढदिवस सामाजिक सेवेत दहा रुपये देऊन गवगवा मात्र पन्नास रुपयांचा करतात, अशांच्या डोळ्यात अंजन घालणारा वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या सर्व नवजात बालिकांना चांदीची पैंजणे,अंगडी टोपडी व स्तनदा मातांसाठी सफरचंदासारख्या पोषक फळांची भेट देत उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी नवनाथ तरंगे याने आपला अनोखा वाढदिवस साजरा केला आहे.या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुहास शेळके, डॉ.देवीदास बोंगाणे, युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक व समाजसेवक प्रशांत शिताप, परिचारिका वृषाली नवगिरे, सचिन भिसे, गणेश टुले,पत्रकार महेश स्वामी, पवन घनवट यांच्या हस्ते यावेळी १० नवजात बालकांना चांदीचे पैंजण, १० बालकांना कपडे, तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
मुलगी जन्मल्यावर तिचे कौतुक करत सामाजिक भावनेतून वाढदिवसाची दिलेली भेट निश्चित प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार काढत प्रशांत शिताप व डॉ.शेळके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नवनाथ तरंगे गेल्या दहा वर्षांपासून इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. नवनाथने कृतीद्वारे स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून स्वतःचा वाढदिवस साजरा केला आहे.