राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्हा व गाव मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या अनेक हॅाटेल, ढाब्यांवर बेकायदा देशी आणि विदेशी दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. एवढेच काय तर कानगाव परिसरात तर किराणा मालाच्या दुकानात देशी आणि विदेशी दारूची विक्री केली जात आहे. तालुक्यात जिरेगाव येथे पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरु असलेल्या बनावट दारु बनविण्याचा कारखान्यावर कारवाई केल्यानंतर दौंड येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग आता हॅाटेल आणि ढाब्यांवरील या देशी आणि विदेशी दारूवर कारवाई करणार का ? याकडे तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.
दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे तीन दिवसांपुर्वी पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरु असलेल्या बनावट दारु बनविण्याचा कारखान्यावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत या पथकाने दोन आरोपींना लाखो रूपयांच्या मुद्देमालासह अटकही केली आहे. दौंड तालुक्यातील कानगाव येथे एका वाहनांमध्ये बेकायदा दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला निदर्शनास आल्याने पुढील तपासात हा सर्व प्रकार उघड झाला. मात्र जिरेगाव येथुन सुमारे तीस किलोमीटर अंतर असलेल्या कानगाव
येथे हा साठा कसा काय सापडला ? हा खरंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तपासाचा भाग आहे. मात्र मागील कित्येक वर्ष तालुक्यात हॅाटेल आणि ढाब्यांवर बेकायदा देशी आणि विदेशी दारूची खुलेआमपणे विक्री चालू आहे. कानगाव येथे तर चक्क किराणा मालाच्या दुकानातचही विक्री सुरू असल्याची चर्चा या परिसरात आहे. यवत पोलीसांनी काही महिन्यांपुर्वी हॅाटेलवर बेकायदा दारू विक्री करताना आढळून आल्याने गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हामार्ग तसेच गावमार्गावर असलेल्या अनेक हॅाटेल आणि ढाब्यांवर
बेकायदा देशी आणि विदेशी दारू, बिअर याची खुलेआम विक्री केली जात आहे. ज्या हॉटेलमध्ये येथे दारू पिण्यास मनाई आहे असे फलक असतो तिथेही हा प्रकार उघडपणे सुरू असलेल्याचे चित्र पहावयास मिळतो. आता हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती नाही हे मात्र नवलच..
एकीकडे यवत व दौंड पोलीसांनी मागील काही दिवासांपासून गावागावातील गावठी हातभट्टी दारूचे अड्ड्यांवर छापे टाकून हे अड्डे उध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र दुसरीकडे हॅाटेल आणि ढाब्यांवर मात्र खुलेआम देशी आणि विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. पाल आणि झोपडी टाकून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांचा दारू अड्डा मात्र उध्वस्त केला जातो. त्यांच्या या बेकायदा दारू विक्रीचे समर्थन मात्र नाही पण श्रीमतांची आणि राजकीय मंडळींची हॅाटेल आणि ढाब्यांवरील बेकायदा दारू विक्रीकडे दुर्लक्ष का केले जाते.त्यांच्यावर एकदा कायद्याचा बडगा उगारावा अशी अपेक्षा नागरीकांची आहे. बिअरबार, देशी दारूचे परवाने देण्याचे अधिकार हे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहेत आणि बेकायदा दारू विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकारही राज्य उत्पादन शुल्क विभागालाच आहेत. मात्र मार्च महिना जवळ आला की राज्य उत्पादन शुल्क विभाग जागा होतो आणि मग बेकायदा दारू वर कारवाई केल्याचा फार्स सुरू होतो. हे सर्व समजण्याइतपत तरी तालुक्यातील नागरीक सुज्ञ आहेत. या हॅाटेल आणि ढाब्यांवर देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा पुरवठा कोण करते ? कोठून येतो हा माल ? या मागे तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील मोठे रॅाकेट असण्याची शक्यता असून काही पोलीस कर्मचारी,राजकीय मंडळी आणि गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळींचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. राज्य उत्पादन शुल्क आणि पुणे ग्रामिण पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यास आणि दोन्ही विभागाने संयुक्त कारवाई करून आपल्या कारवाईचे जाळे टाकल्यास याप्रकाराचे सत्य समोर येईल आणि मोठे मासे पोलीसांच्या गळाला लागतील. मात्र पोलीस प्रशासन ही कारवाई करेल अशी अपेक्षा दौंडच्या नागरीकांना आहे.