मुंबई : महान्यूज लाईव्ह
कोरोनाचा काळात कमी झालेले प्रदूषण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. हवेतील प्रदूषण शोधणाऱ्या जागतिक संस्थेने जाहिर केलेल्या २०२१ च्या आकडेवारीनूसार जगातील १०० सर्वात प्रदूषित शहरातील ६३ शहरे भारतातील आहेत. जागतिक आरोग्य संघटेनेच्या शुद्ध हवेच्या पातळीवर भारतातील एकही शहर उतरलेले नाही.
सतत चौथ्या वर्षी दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षा मापकाच्या २० पट जास्त हवेचे प्रदूषण दिल्लीच्या हवेत आढळले आहे. दिल्ली हे जगातील चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे, परंतू जगातील सर्वात प्रदूषित शहरातील पहिले दोन क्रमांकही भारतातील शहरांनीच मिळविले आहेत.
पहिला नंबर भारतातील राजस्थान राज्यातील भिवाडी शहराने मिळवला असून तेथे हवेतील प्रदूषणाची पातळी १०६.२ वर पोचली आहे. दुसरे शहर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद असून येथील हवेचे प्रदूषणाची पातळी १०२ वर पोचली आहे. तिसरे शहर चीनमधील आहे. भारतातील सर्वात प्रदूषित शहरे ही हरियाणा आणि उत्तर प्रदेशामध्ये आहेत.
भारतातील सर्वात कमी हवेचे प्रदूषण तामिळनाळूतील आरियालपूर येथे आहे. परंतू ह्या शहरातील हवेचे प्रदूषणही जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सुरक्षा मानकांच्या तीनपट आहे.