महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
केंद्रीय तपास यंत्रणा बिगर भाजपशासित राज्यांमध्ये भाजप विरोधकांना लक्ष्य करत आहेत. हा देशव्यापी आरोप केल्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक यांनी ईडीने समन्स बजावताच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बॅनर्जी यांच्या याचिका न स्वीकारल्याने तसेच तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने बॅनर्जी यांना ईडी समोर हजर राहावे लागले.
अभिषेक बॅनर्जी यांनी विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने पुन्हा एकदा 2019 हे वर्ष सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहिले आहे. महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लागण्याचा कालखंड असतानाच शरद पवार यांना ईडी ने नोटीस बजावली होती आणि त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते.
शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणेला थेट आव्हान देत या कार्यालयात आपण जाणार असल्याचे जाहीर केले आणि प्रवर्तन निदेशालय अर्थात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीला शरद पवारांसमोर नमते घ्यावे लागले होते.
त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आता केवळ बिगर भाजपशासित राज्यांमध्ये भाजपने विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी करून सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अर्थात सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नाही हा बॅनर्जी यांना झटका असून त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.