पुणे : महान्यूज लाईव्ह
झोमॅटोने १० मिनिटात डिलिव्हरी देणाऱ्या योजनेबाबत काल घोषणा केली, त्यानंतर आज दिवसभर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर झोमॅटाचे संस्थापक दिपेंदर गोयल यांनी याबाबत व्टिटरवरून स्पष्टीकरण दिले आहे.
आमदार रोहीत पवार यांनीही याबाबत अनेक आक्षेप व्यक्त केले होते. १० मिनिटात डिलिव्हरी देण्याचा दबाव हा डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीवर राहणार आहे. रस्त्यावरचे ट्रॅफिक कसे असेल याची कल्पना कुणालाच नसणार आहे. त्यामुळे या दबावामुळे जर डिलिव्हरी देणाराने अतीवेगात वाहन चालविले आणि त्यातून जर काही नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी कोणावर असेल, अशी आशंका त्यांनी व्यक्त केली केली. जर १० मिनिटात डिलिव्हरी दिली गेली नाही, तर डिलिव्हरी देणारास पेनल्टी द्यावी लागणार काय ? याबाबतही स्पष्टता नाही. डिलिव्हरी बॉयचे काम करणारे बहुतेक विद्यार्थी असतात. त्यामुळे साध्य न होणारे उद्दिष्ट त्यांच्यापुढे ठेवले जाऊ नये असेही रोहीत पवारांनी या विषयी बोलताना म्हणले होते.
रोहीत पवारांप्रमाणे इतरही अनेकांनी या योजनेबाबत आक्षेप घेतले होते. आता झोमॅटोचे संस्थापक दिपेंदर गोयल यांनी व्टिटरव्दारे या योजनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानूसार १० मिनिटात डिलिव्हरी ही योजना फक्त विशिष्ठ जवळच्या ठिकाणांसाठी आहे. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर १० मिनिटात पार्सल पोचविण्याची सक्ती नसेल. १० मिनिटात पार्सल पोचले नाही तर त्याला पेनल्टी लागणार नाही. पार्सल घेण्याची ठिकाणे वाढवली जातील, त्यांना अगदी जवळच्या ठिकाणी, जिथे १० मिनिटात पोचणे शक्य आहे, अशाच ठिकाणची डिलिव्हरी देण्यास सांगितले जाणार आहे.
अशा प्रकारे १० मिनिटात डिलिव्हरीची योजना असल्याचे दिपेंदर यांनी सांगितले.
अर्थातच अजून ही योजना प्रत्यक्षात आलेली नाही. त्यावेळी ती प्रत्यक्षात येईल त्याचवेळी नक्की काय घडते ते पहावे लागेल.